विनय नारकर viva@expressindia.com

मराठी रंगसंवेदनांची घडण होताना महाराष्ट्रातील निसर्गाचा कसा परिणाम होतो, हे आपण मागच्या लेखातून जाणून घेतले. काळ्या रंगाबद्दलची आपुलकी मराठी मनांत कशी घडत गेली व तिचे प्रतिबिंब मराठी वस्त्रांवर कसे पडत गेले हेही आपण पाहिले.

काळ्या रंगाशिवाय इतर रंगांबद्दलची मराठी संवेदना जाणून घेताना, त्याही बाबतीत आपल्याला काही गोष्टी जाणवतात. महाराष्ट्रातल्या निसर्गात तसा कोणत्या बाबतीत अतिरेक नाही. गुजरात, राजस्थानसारखं अति ऊन नाही की अन्य काही प्रदेशांसारखा प्रचंड पाऊस नाही. अशा निसर्गामुळे आणि काळ्या रंगाच्या प्रभावामुळे इथे गडद आणि सौम्य रंग प्रिय आहेत. महाराष्ट्रातल्या वास्तुकलेत ही अशाच रंगांचा प्रभाव दिसून येतो.

महाराष्ट्रातल्या चित्रकलेतही, मग ती मराठी लघुचित्रशैली असो वा बॉम्बे स्कूलसारखी आधुनिक चित्रशैली, त्यातही अशा गडद रंगांचाच वापर केलेला दिसून येतो. सरावलेल्या दृष्टीला मराठी चित्रे लगेच लक्षात येतात, त्याचे महत्त्वाचे कारण चित्रांमधील वेषभूषा व रंगसंगती हे असते. याच रंगसंवेदना मराठी वस्त्रांमध्ये उमटणे स्वाभाविकच आहे. मराठी वस्त्र परंपरांची रंगांच्या अनुषंगाने विकसित झालेली ओळखसुद्धा काही शतकांपूर्वीच झाली आहे. मराठी वस्त्रांचं रंगविश्व अतिशय विलोभनीय आणि मनोज्ञ आहे. आज आपण आपली रंगओळख विसरलो आहोत असे वाटण्याचा काळ आला आहे, मात्र जुन्या मराठी साहित्याने आपले रंगविश्व आपल्यासमोर उलगडून ठेवले आहे.

एका मराठी काव्य असे आहे, ज्यामध्ये साडय़ांचे रंगांच्या अनुषंगाने वर्णन करण्यात आले आहे. सहसा जुन्या काव्यांमध्ये जेव्हा साडय़ांचे किंवा अन्य वस्त्रांचे वर्णन किंवा संदर्भ येतो, तो त्या साडीच्या किंवा वस्त्राच्या प्रकारावरून असतो. या काव्यात मात्र साडय़ांचे रंगांवरून काय प्रकार होतात, याबद्दल रसपूर्ण वर्णन सापडते. इ.स. १५१३ मध्ये भानुदास शाळीग्राम खडामकर यांनी ‘श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य’ हा पोथीवजा ग्रंथ लिहला. भानूदास खडामकर हे स्वत: विणकर होते. साळी समाजाचे आद्यपुरुष श्री जिव्हेश्वर स्वामी यांच्याबद्दलची ही पोथी आहे. श्री जिव्हेश्वर स्वामींचे चरित्र व त्या अनुषंगाने साळी समाजाचे ज्ञातिपुराण लिहायचे, या मनीषेने भानुदासांनी ही रचना केली आहे. भानुदास हे संत एकनाथांचे आजोबा भानुदास पंडित यांचे स्नेही होते. हे काव्य रचताना त्यांनी भानुदास पंडितांचे मार्गदर्शन घेतले. काव्य रचनेची कोणतीही पार्श्वभूमी वा अनुभव नसताना लिहिलेल्या या पोथीने मात्र एकाप्रकारे त्या वेळच्या वस्त्र प्रकारांबद्दल व विणकामाबद्दलचे दस्तऐवजीकरण केले आहे.

या पोथीचा शोध मला योगायोगाने लागला. दोन महिन्यांपूर्वी कामानिमित्त आम्ही महेश्वरला गेलो असता, तिथे एका मूळच्या मराठी असणाऱ्या विणकराची गाठ पडली. त्यांच्या गप्पा सुरू असता मी त्यांना साळी समाजाबद्दल काही साहित्य उपलब्ध आहे का अशी विचारणा केली. ते म्हणाले, त्यांचे एक नातेवाईक या विषयावर काम करतात, असे म्हणून  लोणकर यांचा संपर्क दिला. लोणकर यांची आम्ही भेट घेता, त्यांच्याकडून आम्हाला या पोथीबद्दल माहिती मिळाली. लोणकर यांचा साळी समाजाचा बराच अभ्यास आहे, त्यामुळे या ग्रंथाची पुर्वपिठी काही आम्हास समजू शकली.  त्याच्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

‘श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य’ या ग्रंथाच्या अकराव्या अध्यायात मराठी साडय़ांच्या रंगांबद्दल असे वर्णन येते,

त्यानंतर जिव्हेश्वर साळियाने। चालविले माग। साडय़ा आणि पीतांबर। काढिले एकाहूनी एक सुंदर॥

काळी चंद्रकळा॥

पिवळे रंगाची पोफळी॥

एक सुंदर गुंजी निळी॥

उडदाचा रंग शोभला॥

तांबडा रंग शोभिवंत॥

त्याच गुलाबी रंग मिरवित।

आणि हिरवा रंग त्यात।

पसीला म्हणती जयासी ॥

काळी आणि पांढरी।

मिळून विणती गुजरी।

दिसण्यात अति साजरी।

उत्तम प्रकारची जाणिजे॥

काळा त्यात तांबडय़ाची मिळवणी।

त्याची केली मिराणी।

तेज तळपे सौदामिनी।

अति सुंदर चांगली॥

गुंज म्हणती गुलाली।

सुंदर वेली नागवेली।

रास त्याची मिसळली।

काळा पांढरा रंग त्याचा॥

फाजगी अंजिरी सुंदर

तांबडा हिरवा प्रियकर।

रंग तेजस्वी सुंदर तेजाकर।

मनोहर साजिरा॥

रंगभूल पडावी असे हे काव्य.. वस्त्रांमधल्या रंगांची ही सुरेख नावं आपल्यापर्यंत या काव्याने पोहोचवली तर आहेतच, त्यासोबत कोणती रंगच्छटा कोणत्या रंगांपासून बनायची हेही एरवी समजणं शक्य झालं नसतं.

मराठी रंगसंवेदना जाणून घेताना, मागच्या लेखात काळ्या रंगाचं आणि मराठी मनाचं नातं आपण पाहिलं. काळ्याशिवाय किंवा  काळ्यानंतर असा कोणता रंग आहे जो मराठी वस्त्रांमध्ये आपला आब राखून आहे.. तर साहजिकपणे आपल्या डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे पीतांबराचा पिवळा. पीतांबर आणि त्याचे महत्त्व आणि लोकप्रियता, याबाबत आधीच्या तीन लेखांमध्ये विस्तारपूर्वक विश्लेषण आले आहे.

याच रंगकाव्याचा विचार करता, पहिल्या दोन रंगांची नावे अशी आली आहेत,

काळी चंद्रकळा॥

पिवळे रंगाची पोफळी॥

म्हणजे इथेही आधी काळा आणि मग पिवळा असाच उल्लेख आहे. आपल्याला अगदी रंगांची क्रमवारी लावण्याची गरज नाही, पण रंगसंवेदनांचा अभ्यास करण्यासाठी सोयीचे म्हणून अशा पद्धतीने आपण पाहू शकतो.

पिवळ्या रंगाच्या वस्त्राला ‘पोफळी’ असं म्हटलं जायचं. महाराष्ट्रातला हा पोफळी म्हणजे, पंजाबमधला धम्मक पिवळा नाही किंवा राजस्थान, गुजरातमधला भडक पिवळा नाही. तर जरा सौम्य व गडद असा पिवळा आहे, म्हणजे पोफळीच्या पक्व फळासारखा, नजरेला न खुपणारा.

मुगी पोफळी लाजीवळे 

सेवंती बोजाणी सोज्जवळें।

निकोप तापेची पातळे। अति मवाळे शोभती।

कवी मुक्तेश्वर यांच्या काव्यातही असे सुंदर वर्णन आहे.

म्हाइंभटांच्या साधारण १२८८च्या ऋद्धीपुर चरित्रात, (जे श्री गोविंदप्रभू चरित्र म्हणून ओळखले जाते), ‘पोफळी’चा उल्लेख आहे. आबाइसासाठी वस्त्र घेण्यासंबंधीच्या परिच्छेदात, श्री गोविंद प्रभूंच्या तोंडी हे वाक्य येते, ‘‘..काजळीचें वस्त्र नेसावें म्हणे : पोफळिचें घेयावें म्हणे : ’’

इथेसुद्धा काजळीचे, म्हणजे काळे वस्त्र आधी व पोफळीचे म्हणजे पिवळे वस्त्र नंतर असाच उल्लेख आला आहे. याच ग्रंथात पुढे एक विशेष उल्लेख आला आहे. तो आहे रंगपूजेचा. त्याकाळी रंगपूजा करण्याचा रिवाज होता असे दिसून येते. रंगपूजा नेमकी कशी घातली जाते, याबाबत नीट माहिती मिळत नाही. परंतु रंगपूजा म्हणजे निरनिराळ्या रंगाच्या रांगोळ्या घालून केलेली पूजा असं डॉ. वि. भि. कोलते यांनी म्हटलं आहे. तर या काव्यातही रंगांचा असाच क्रम आला आहे,

मग रंग मेळवीले :

काळे पीवळें हिरवे लोहिवे ऐसे रंग मेळवीले :

वस्त्रांसाठी हा पिवळा रंग बनवताना विशिष्ट प्रकारची बारीक हळद लागत असे, या हळदीला चोर हळद म्हणत असत. त्याशिवाय हरसिंगारच्या काडय़ा, करडीची फुले, टेसूची फुले आणि पिवळी माती अशा गोष्टी लागत असत. जुने विणकर सांगतात की, पैठण्यांमध्ये काळ्या व पोफळरंगी पैठण्या बनवण्याचे प्रमाण सर्वात जास्त होते. आपण पाहिले होते की, सर्व धार्मिक विधी, सण समारंभ, विवाहप्रसंगी पिवळ्या वस्त्राचे काय व किती महत्त्व असते. लग्नाआधी ‘हळदी’चा विधी ही खूप महत्त्वाचा असतो. आपल्याकडे लग्नात वधूला मामाकडून पिवळी अष्टपुत्री दिली जाण्याचा रिवाज होता. जुने आयुष्य संपवून, नवीन आयुष्य सुरू करणे यासाठी प्रतीक म्हणजे पिवळा रंग, म्हणून वधूला पिवळी अष्टपुत्री दिली जायची. महाराष्ट्रात काही भागांत आजही लग्नात वधूने पिवळी साडी नेसण्याची प्रथा आहे.

पिवळा रंग हे पूर्णत्वाचे, उत्साहाचे, तारुण्याचेही प्रतीक मानला गेला आहे. एका लावणीत म्हटले आहे की,

पिवळा शालू बासणातील गडे उंच दोन मजलीचा रे

तू नेस राजसबाळी पिवळा रंग भर ज्वानिचा रे

किंवा

तारुण्यात भरतनु कवळी चंपककी।

बनलेली पिवळी।

कुच कंचुकीत कसकसू आवळी।

विलय विलासी नाहीत जवळी॥

शाहीर अनंत फंदी म्हणतात,

‘आधीच निबर जोबन त्यावर पीतांबराची चोळी जबर’

शाहीर होनाजी बाळांनी गणपतींचे वर्णनही असे केले आहे,

पीतवर्ण वस्त्र कासेशी कशीने बरवे॥

पिवळ्या रंगाच्या वस्त्रांबद्दल संत, पंत, तंत अशा सगळ्या काव्यांमध्ये भरभरून उल्लेख आहेत. पिवळ्या वस्त्रासाठी, कनकांबर, पीतवसन, कनकवसन असेही शब्द वापरले गेले आहेत. भाषाप्रभू, शब्दप्रभू मानले गेलेल्या मोरोपंतांनी त्यांच्या काव्यामध्ये पिवळ्या वस्त्राला अतिशय मोहक शब्द योजले आहेत. त्यापैकी काही ओळी याप्रमाणे आहेत.

‘पीताभवस्त्र वहनो पीता, गोपाळ – गो – गोपी तारकांध्र वनीचा’

‘जा कुंजी, मुरली दे शोधुनि नेऊनि याची कनकपटा’

‘न गणी तोआ पापी, तो टापा पीतपट विभुसि हाणि:’

‘त्याच्या उत्संगावरी कनकविभांवर नबांबुदश्याम’

कवी मोरोपंतांनी पीताभवस्त्र, कनकपट, पीतपट, कनकविभांवर अशा शब्दांमधून पिवळ्या वस्त्रामधील काव्यत्मकता सुरेख रितीने वर्णिली आहे.

त्याचबरोबर, कवी निरंजन माधव यांनी पिवळ्या वस्त्रांसाठी, पीतकौशेयधारी, पीतपटसुवर्ण, पीतांशुक असे अलंकारिक शब्द योजिले आहेत.

शाहीर सगनभाऊंनी तर ‘पिवळी सुंदरा’ अशी लावणीच लिहिली आहे.

मी पिवळी पाकळी पिवळा प्राणसखा चाफ्याची कळी॥

पिवळे तेज कसे पिवळी कांती॥

प्रियकर माझा पती॥

पिवळे डागिने छब विलायती॥

पिवळेच कंकण हाती॥

पिवळे सूर्य तुम्ही मी प्रभा किती॥

रायाच्या संगती॥

पिवळी बनुन आले स्वामीजवळी॥

मला पिवळे पातळ बारीक गवती॥

पदरावर शेवंती॥

पिवळी काचोळी जडली मोती॥

गोट किनाऱ्या भोवती॥

पिवळी पूतळी बनुन फिरते भोती॥

रायाच्या संगती॥

कवी ना. धों. महानोरांच्या काव्य प्रतिमेने पिवळाख्यानाची सांगता करू,

पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना

बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना..