मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
कुणाला सुंदर दिसायला आवडणार नाही? प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की, आपण सुंदर दिसावे. त्यासाठी बाजारातील विविध मेकअप प्रॉडक्ट्स विकत घेतली जातात. परंतु त्याचे योग्य रीतीने अ‍ॅप्लिकेशन केले गेले नाही तर तुम्हाला हवा असलेला लुक मिळत नाही आणि चेहराही खराब दिसतो. हे टाळण्यासाठी आणि मेकअपमध्ये बारकावे आणण्यासाठी ब्रशेस खूप महत्त्वाचे काम करतात. मेकअप करताना बोटाऐवजी ब्रशेसचा वापर अनेक कारणांनी उपयुक्त ठरतो. ब्रशने केलेला मेकअप हा इव्हन आणि पॉलिश्ड लुक देतो आणि हायजिनिकही असतो. ज्यांना चेहऱ्यावर पिंपल्स असतील त्यांनी तर ब्रशच वापरले पाहिजेत. कारण हाताने किंवा बोटाने मेकअप करत असताना पिंपल्स फुटून पस चेहऱ्यावर इतरत्र पसरण्याची शक्यता असते आणि चेहरा आणखीनच खराब होऊ शकतो.म्हणूनच ब्रशचे विविध प्रकार आणि त्यांचा वापर याबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे.
कुठले ब्रशेस तुमच्या मेकअप किटमध्ये असायला हवेत हे तुमचा दैनंदिन मेक-अपच ठरवू शकतो. काही जणी डोळ्यांना फारसा मेकअप करत नाहीत, त्यांनी डीटेल्ड वर्ककरिता वापरले जाणारे ब्रश स्किप केले तरी चालेल. प्रत्येक स्त्रीने एक ब्लश ब्रश विकत घ्यावाच, कारण मेकअप किटमधील हा ‘मल्टी टास्कर’ आहे. नॅचरल फायबर्स असलेले ब्रश खूप चांगला रिझल्ट देतात. अशा पद्धतीने सुरुवात करून ब्रशचे कलेक्शन वाढवता येते.
आय ब्रशेस
१. फ्लॅट स्टिफ ब्रश ((Flat Stiff Brush) : आयशॅडो अप्लाय करण्यासाठी याचा वापर केला जातो. ब्रशचा आकार चपटा आणि कडक असतो. त्यामुळे जास्तीत जास्त आयशॅडो ब्रशमध्ये घेता येतो व पापणीवर योग्य पद्धतीने प्लेस करता येतो. हा ब्रश स्टिफ असल्यामुळे आयशॅडो फक्त प्लेस करावा, मीक्सिंग करू नये, त्याकरिता स्टिफ डोम ब्रश वापरावा. जेणेकरून ब्रशची क्वालिटी टिकून राहते आणि डोळ्यांनाही त्रास होत नाही. पुढील टोकदार भागाचा वापर डोळ्यांच्या क्रीस लाइनवर ठळक लाइन उमटविण्याकरिताही होतो.
२. पेन्सिल ब्रश (Pencil Brush) : प्रामुख्याने पेन्सिल ब्रश मेकअप आर्टस्टि वापरतात. जर तुम्हाला डोळ्यांचा हेवी मेकअप करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच तो घेऊ शकता. ‘स्मोकी आइज’चा इफेक्ट आणण्याकरिता डोळ्यांच्या खालच्या भागाकरिता याचा सर्वात जास्त वापर केला जातो. ब्रशचे टोक बारीक असल्यामुळे डोळ्यांच्या कडाही डिफाइन करता येतात.
३. स्टिफ डोम ब्रश (Stiff Dome Brush) : या प्रकारचे ब्रश विविध साईझेसमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मोठय़ा साईझच्या ब्रशचा वापर हा कलर पसरविण्यासाठी आहे. तसेच लहान डोळ्यांसाठी लहान साईझ वापरावी. स्मोकी आयचा इफेक्ट देताना कलर स्प्रेड करण्यासाठी किंवा शार्प लाइनचे ब्लेण्डिंग करताना हा ब्रश उपयुक्त ठरतो. थोडक्यात या ब्रशचा उपयोग कलर लावण्यासाठी नसून कलर मिक्सिंग / ब्लेण्डिंगसाठी आहे.
४. सॉफ्ट डोम ब्रश (Soft Dome Brush) : सुरुवातीला तुमच्या ब्रशच्या कलेक्शनमध्ये स्टिफ डोम किंवा सॉफ्ट डोम, दोघांपकी एक ब्रश ठेवा. कारण याचासुद्धा वापर कलर ब्लेण्डिंगकरताच आहे. याचे ब्रिसल्स अतिशय मऊ आहेत. तुम्हाला मेकअपमधे डीटेलिंग हवे असेल तर हा ब्रश तुमचे काम नक्कीच सोपे करेल. खासकरून याचा वापर मेकअप आर्टस्टि फॅशन शोज् किंवा फोटो शूटमध्ये डोळ्यांच्या मेकअपमधील बारकावे आणण्यासाठी करतात.
५. बेंट लाइनर ब्रश (Bent Liner Brush) – चित्रात दाखवल्याप्रमाणे या ब्रशची रचना जेल / लिक्विड आयलाइनरसाठी आहे. ब्रशची तिरकी बाजू पापणीच्या वराच्या भागावर ठेवून पापणीच्या पंखासारख्या आकार असलेल्या भागावरून ओढत न्यावी. ब्रशच्या निमुळत्या टोकामुळे लाइनरचे विविध आकार देता येतात. उदा. कॅट शेप, विंज्ड आउटलाइन. एकंदरीत आयलाइनर लावण्यासाठी अतिशय उपयुक्त ब्रश आहे. ब्रशच्या विशिष्ट रचनेमुळे आयलाइनरची फाइन लाइनही लावता येते आणि वेगवेगळे आकारही देता येतात. ज्यांचे आयलाइनर लावताना हात थरथरतात त्यांना या ब्रशची नक्कीच मदत होईल.
६. डय़ुएल एंडेड लॅश/ ब्रो ब्रश  (Dual Ended Lash/ Brow Brush) : दररोजच्या लाइट मेकअपसाठीही हा ब्रश महत्त्वाचा आहे. ब्रशला दोन बाजू आहेत, एक बाजू चपटी आहे व तिला तिरका कट असून हा भाग कडकही आहे. मस्कारा किंवा आयब्रोजच्या फिलिंग करता या बाजूचा वापर करावा. डोळ्यांच्या खालच्या भागला आयलाइनर लावायचे असल्यास ब्रशच्या या स्टिफ भागाचा वापर करतात. दुसरी बाजू ही गोलकार स्टिफ ब्रिसल्सची असून दोन भागांत विभागली आहे. एका भागात ब्रिसल्सची लांबी जास्त आहे, त्याच्याने मस्कारा अप्लाय केलेल्या पापण्या वेगळ्या करून कर्ल लुक द्यावा. दुसऱ्या भागात ब्रिसल्सची लांबी कमी आहे, त्याच्याने फिलिंग केलेल्या भुवया विचराव्यात. असे केल्यास भुवया व पापण्या दाट दिसतात.
पुढच्या भागात फेस ब्रशेस आणि ब्रश वापरण्यासंदर्भातील टिप्स पाहू या..