पेट सीटिंग अर्थात प्राण्यांचं पाळणाघर ही परदेशातली कन्सेप्ट आता आपल्याकडे चांगलीच रुजू लागली आहे. प्राणीप्रेमी तरुण-तरुणी आवडता छंद म्हणून पेट सीटिंग करू लागले आहेत. पेट सीटिंगसाठी काही ऑनलाइन ग्रुपही बनले आहेत.
आपल्यातील अनेकांना प्राणी पाळण्याची सवय असते. त्यात कुत्रा आणि मांजर हे विशेष. पण ही स्वत:ची हौस भागवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि बंधनंही घालून घ्यावी लागतात. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे कुठे काही कामानिमित्त बाहेर जायचं झालं आणि घरी कोणीच नसलं तर या कुटुंबातल्या सदस्याचा सांभाळ कोण करेल याची. पण आता ‘पेट सीटिंग’चा पर्याय उपलब्ध आहे. ‘पेट सीटिंग’ म्हणजे प्राण्यांचं पाळणाघर. परदेशात प्रसिद्ध असलेला हा प्रकार आता भारतातही हळूहळू रुजत आहे. पाळीव प्राण्यांसाठी ‘डे केअर सेंटर’ असतात आणि अगदी पाळणाघरंही असतात.
नवी मुंबईची राधिका जव्हेरी याच ग्रुपची एक सदस्य. ‘या ग्रुपवर पेट सीटिंग हवे असणारे लोक आपली गरज सांगतात आणि त्याप्रमाणे ज्या सदस्याला जमू शकेल तो प्राणी सांभाळण्याची जबाबदारी घेतो. प्राण्यांच्या मालकाकडून एकही पसा घ्यायचा नाही हा नियम मात्र सगळ्यांकडून पाळला जाणं बंधनकारक असतं’, राधिका सांगते.
राधिकाला मुळातच प्राणी पाळण्याची आवड. लहानपणापासून घरात कुत्रे आणि मांजरांची रेलचेल. पण लग्न होऊन घर सोडून आल्यावर आपल्याकडील कुत्र्यांना ती मिस करू लागली. आपणही प्राणी पाळावा, असं राधिकाला वाटायचं.
पण तिचं शिक्षण आणि नवऱ्याची नोकरी यामुळे दिवसभर कुत्र्याला कोण सांभाळणार या विचारामुळे तिला स्वत:च्या आवडीला मुरड घालावी लागली. पण नंतर मात्र आपली आवड जपायला तिने ‘पेट सीटिंग’ करण्याचा निर्णय घेतला.
राधिकाला एकदा बाहेर जाताना स्वत:कडच्या मांजरीला कुठे ठेवायचं असा प्रश्न पडला. त्या वेळी घराजवळच्या एका ‘पेट शॉप’मध्ये तिने काही दिवसांसाठी आपल्या मांजरीला ठेवण्याचा निर्णय घेतला. पण अनेक पेट शॉप्समध्ये प्राण्यांची निगा राखली जात नाही, हे तिच्या लक्षात आलं. छोटय़ा पिंजऱ्यात प्राण्यांचा आकार न बघताच त्यांना डांबलं जातं, त्यांची नीट निगाही राखली जात नाही. हे सर्व बघून इतरांच्या पाळीव प्राण्यांची जमेल त्या पद्धतीनं काळजी घेण्याचा निर्णय तिनं घेतला.
‘सामान्यत: सुट्टीच्या दिवशी किंवा वीकएण्ड्सला लोक बाहेरगावी जातात आणि तेव्हाच आपल्या पाळीव प्राण्याचा सांभाळ करण्याची अडचण उद्भवते. तेच दिवस मलाही जमू शकतात, त्यामुळे मी तेव्हाच पेट सीटिंग करते. त्या निमित्ताने माझ्या घरी प्राणी येतात,’ असं राधिका सांगते.
राधिकाप्रमाणेच मुंबईतले साधारण २० व्हॉलेंटिअर्स पेट सीटर्स ग्रुपसाठी हौसेनं काम करतात. पेट सीटिंग हा आवडीचा असला तरी सोपा छंद नक्कीच नाही, असं राधिका सांगते. काही कुत्रे खूपच रागीट असतात, अनेकदा ते चावण्याचाही धोका असतो. अशा वेळी मालकांशी बोलून घेऊन प्राण्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं असतं. काही प्राण्यांना तर स्वच्छतेचं नीट ट्रेनिंगही दिलेलं नसतं. असे प्राणी घरात अनपेक्षितपणे घाण करतात. काही तर शिस्त लावूनही घेत नाहीत. पण एकदा जबाबदारी घेतली की त्यातून सुटका करून घेता येत नाही. पण जसजसा काळ जातो, तसतशी त्याची मज्जाही येत जाते, हे राधिका आवर्जून सांगते.
आपल्यातील समजा कोणाला अशीच आवड असेल तर एक छंद म्हणून ‘पेट सीटिंग’बद्दल विचार करायला काहीच हरकत नाही.
छंदातून प्रोफेशनकडे
– शलाका मुंदडा, पेट सीटर्स (पुणे)
मी गेली अनेक वर्षे डॉग ट्रेनिंग देतोय आणि त्या दरम्यान मला लक्षात आलं की, लोकांना बाहेरगावी जायचं असतं तेव्हा पेटला कुठे ठेवायचं, हा मोठ्ठा प्रश्न असतो. या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी ५ वर्षांपूर्वी टोगो डॉग केनेल सुरू केलं. काही केनेलला क्लायंट्सच्या मागणीवरून पर्सनल गार्डन आहेत तर काही एसी केनेलसुद्धा आहेत. मी सुरुवातीला अडीच वर्षे बंगलोरला जाऊन डॉग कंट्रोल ट्रेनिंग घेतले, परंतु नंतर पेटसोबतच्या वाढत चाललेल्या बॉण्डिंगमुळे पेट केनेलपर्यंत पोहोचलो. लोक ट्रेनिंग बाबतीत काटेकोर असतात, पण त्यासाठी फक्त ट्रेनरवर डिपेंड न राहता आपल्या पेटला वेळ देणं ही मालकाची जबाबदारी असते. पेटला मालकाच्या अटेंशनची सुद्धा गरज असते!
– राजेश सिंग, टोगो फार्म क्लब (भिवंडी)
(संकलन : भक्ती तांबे)