विनय नारकर
‘लावणीतील वस्त्रबोली’ या लेखाच्या आधीच्या दोन भागांत आपण प्रामुख्याने शाहीर परशराम व शाहीर होनाजी बाळा यांच्या लावण्यांमधून आलेले वस्त्रसंदर्भ पाहिले. यांच्याशिवाय इतरही शाहिरांनी आपल्या रचनांमधून लावण्या आणि वस्त्रं यांचा जुळून आलेला सौंदर्यबंध उलगडला आहे.
बऱ्याच शाहिरांनी एकेका रंगावर आधारित शृंगाराचे वर्णन असणाऱ्या लावण्या रचल्या आहेत. अशा प्रकारच्या लावण्यांमध्ये वस्त्रे, दागिने, सजावट या सगळ्यांचा एकाच रंगात सौंदर्यसमन्वय साधलेला असतो. होनाजीने लाल रंगात व हिरव्या रंगात शृंगाररस उधळला आहे. तसेच शाहीर सगनभाऊंनी पिवळ्या रंगाची उधळण एका लावणीमध्ये केली आहे. ‘सांज रंगेला करवा’ या वीरक्षेत्री लावणीमध्ये तर चार दिवस चार रंगांचा शृंगार करावा अशी आर्जवे नायिका आपल्या नायकास करत आहे. वीरक्षेत्र म्हणजे बडोदा.
सखया चार दिवस नित्य नवा
साज रंगेल करवा
पहिले दिवशी सफेतिच कर सारी
आण पातळ चंदेरी
डागिने मोत्याचे नखसीखवरी
आणिक जात दूसरी..
दुसरे दिवशीं भडक शाली लाल
पैठणचा भर गोल
अंगावर गुलेनार घेत शाल
लालि लाल माहाल..
तिसरे दिवशी पिवळी शेलारी
कलाबतू जरतारी
पिवळे डागिने चक सोनेरी
साज आणा दुहेरी..
चौथे दिवशीं बाग हिरवा पाहून
राहूं आपण तिथें जाऊन
हिरवा शालू काच आणवा चाहून
गहेऱ्या छायेंत राहुन..
साज रंगेला करवा
चार दिवस, चार रंगांचा शृंगार करताना चार निराळ्या प्रकारच्या साडय़ांची मागणी ही नायिका करते. श्वेत चंदेरी, लाल पैठणी व त्यांवर गुलेनार म्हणजे डाळिंबी शेला, पिवळी शेलारी आणि हिरवा शालू. कोणत्या प्रकारची साडी कोणत्या रंगात सगळ्यात जास्त शोभिवंत वाटते हे या शाहिराला नेमके समजते. ‘पैठणचा भर गोल’, या ओळीतील ‘गोल’ म्हणजे पदर. पदरासाठी गोल हा शब्द आता कुणी योजित नाही.
या चार प्रकारच्या साडय़ांपैकी ‘शेलारी’ ही साडी आता नामशेष झाली आहे. शेलारी म्हणजे पैठणी आणि शालू या परंपरांचा मिलाफ होता. बुऱ्हाणपूर येथे प्रामुख्याने ही साडी विणली जायची. पैठणीखालोखाल शेलारीचा मान होता.
‘का गे रूसलीस? सांग सुंदरी’ या लावणीमध्ये शाहीर अनंत फंदी यांनीही शेलारीचा उल्लेख केला आहे,
‘नेसुनी शेलारी लाल कंचुकी..’
तसेच शाहीर गोविंदराव यांची ही झोकदार लावणी बघा..
बारूळासी चालली बावटी
ठुमकत ठुमकत चतुर गोरटी
नेसुनीया शेलारी जरी, घातली केशरी उटी
झरूक्यांत उभी गोरटी, पीतांबर कटी नेसूनी पिवळा
बेबहार समय गुजरीचा, करी गतिगतिने गायनकळा
शाहीर सगनभाऊंना पिवळ्या रंगाचं खूप आकर्षण. त्यांनी ‘पिवळी सुंदरा’ अशी लावणीच रचली आहे.
मी पिवळी पाकळी पिवळा प्राणसखा चाफ्याची कळी।
पिवळे तेज कसी पिवळी कांती।
मला पिवळे पातळ बारीक गवती॥
पदरावरती शेवंती।
पिवळी काचोळी जडली मोती॥
या रंगांच्या लावण्यांची पूर्वपीठिका सापडते ती एकनाथांच्या गौळणीमध्ये. एकनाथांची पाच रंगांमध्ये शृंगार सजलेली गौळण प्रसिद्ध आहे.
आल्या पांच गौळणी।
पांच रंगाचे शृंगार करूनी॥
दुसरी गौळण भाळी भोळी।
रंग हळदीहून पिवळी॥
पिवळा पितांबर नेसुन आली।
आंगी बुट्टेदार चोळी॥
लहान तनु उमर कवळी। जशी चांफ्याची कळी॥
ऐशा आल्या त्या नटोनी। आल्या पांच गौळणी॥
आधुनिक लावणीमध्ये शांता शेळकें नी हिरव्या रंगाची अप्रतिम लावणी लिहिली आहे.
हिरव्या रंगाचा छंद राया पुरवा।
मला हिरव्या पालकित मिरवा॥
हिरवी साडी, हिरवी चोळी।
हिरवं गोंदण गोऱ्या गाली॥
हिरवे तीट कुंकवा खाली।
घाला वेणीत हिरवा मरवा॥
लावणी साहित्यामधून जसं निरनिराळ्या वस्त्रांची माहिती होते, त्याप्रमाणे काही वस्त्ररचनांबद्दलही समजते.
लालभडक वेणि सडक अत्तर चमेलिमधिं भिजली
कसुन कटिं पातळ दीडमजली
– सगनभाऊ
सुबक नाजूक कंबर देखणी।
कटी कसला दीडमजला शालू॥
-होनाजी
दोमजला पैठणचें पातळ लफ्फा घे टाचेची खबर
आधीच निबर जोवन
त्यावर पितांबराची चोळी जबर
लाल शालू जशि मशाल घरची
खुशाल दो पैशानें गबर
पहा कुणाची प्रभा उत्तमा तेव्हां तर्फडी मात जबर
-अनंत फं दी
सफेत पातळ सिंहकटीवर
खुब शोभतसे तिनमजली
पदर वरून आंत किंचित
भासे शमे उराची खुण बुजली
-महादू प्रभाकर
या चार शाहिरांच्या चारही लावण्यांमध्ये दीडमजला, दोमजला, तीनमजला पातळांचे उल्लेख आले आहेत. इथे मजला म्हणजे साडीची किनार किंवा नक्षीकामाचा निरनिराळा भाग. एकावर एक किनारी किंवा नक्षी असलेली साडी. हा या अर्थाने कालबाह्य़ झालेला ‘मजला’ हा शब्द या लावण्यांमधून जिवंत राहिला आहे.
स्त्रियांसाठी साडी हे फक्त एक वस्त्र नसते. ते तिचे व्यक्त होण्याचे एक साधनही असते. साडीच्या पदराचा वापर स्त्रिया न बोलता बोलण्यासाठीही करतात. ही बाब नेमकी हेरून शाहीर प्रभाकर ‘मोहिनी जसी सुरसभेमधीं..’ या लावणीमध्ये हे दाखवतो..
दुधि कांचन झाऱ्या भरून।
घ्या घ्या म्हणणे आदरें करून।
हावभाव दावि पदरावरून॥
याच लावणीत पुढे प्रभाकर नेटकेपणाने लुगडें कसे नेसावे याचे वर्णन करतो,
नभरंगाचे वसन कटीला निरी चोपिव ना फुटे।
पदर पल्लेदार मागे सुटे॥
सतेज सरीं शोभती वरी दाट जरीचे बुटे।
चमक जणुं नक्षत्रांची सुटे॥
त्या वेळच्या कित्येक लावण्यांमधून आपले वस्त्रवैभव झळकताना दिसते.
नेसुनी जरी सोनसळा रंग पीवळा।
गोरि कांति करी झळझळा बहार कोंवळा॥
छबिदार सुरत गुलपरी.. या लावणीतल्या या ओळीत ‘सोनसळा’ हा शब्द आला आहे. सोनसळा या लुगडय़ाच्या अंगावर सोनेरी पट्टे असायचे. हे लुगडेही खूप लोकप्रिय होते. इथे खास नमूद करण्याची बाब म्हणजे, या सोनसळा लुगडय़ाचा उल्लेख लीळा चरित्रातसुद्धा आला आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंत हे लुगडे बनत होते. म्हणजे किमान सात-आठशे वर्षे सोनसळा हे लुगडे विणले जात होते.
शाहिरांनी अनेक प्रकारच्या वस्त्रांबद्दल लिहिले आहे, वस्त्रांचा प्रतिमा म्हणून वापर केला आहे. काही ठिकाणी तर स्त्रीसौंदर्याला शाहिरांनी वस्त्रांचीच उपमा दिली आहे. नायिकेच्या गोऱ्या कांतीला शाहरी ‘उंच मुकेसी’ अशी उपमा देतो. मुकेसी हे सोनेरी बुटीदार, भरजरी असे वस्त्र होते.
एका लावणीमध्ये एक कुमारिका नायिका म्हणते, ‘उंच वस्त्र चोलटू नका हो मी गजनी कोरी..’ ही नायिका स्वत:ला ‘कोरी गजनी’ म्हणवून घेते आहे. ‘कोरी’ या शब्दातून शाहीर तिचे कौमार्य ध्वनित करतोय. गजनी हे एका विशिष्ट प्रकारचे उंची वस्त्र होते. हे अफगाणिस्तानमधील गझनी शहरात विणले जायचे. हे अर्धे सुती व अर्धे रेशमी असे असून एका बाजूने रंगीत व वर पट्टे किंवा रेघा असलेले वस्त्र असे.
शाहीर अनंत फंदी हे आपल्या एका हिंदी, मराठी, गुजराती या भाषांतील मिश्र लावणीमध्येही गजनी आणि चंद्रकळेचा उल्लेख करतात.
बारा बरसका पठा देखो अंगी नयनपर डारी।
रुमझुम पाऊल बजावत..
लालभडक गजणीको लहेंगा।
चंद्रकला उपर पेणी॥
आणखी एका लावणीत शाहीर नायिकेच्या कांतीला अशीच वस्त्राची उपमा देताना म्हणतो,
मुलायम शरीर तुझे,
जैसे भरजरी पैठणचा झुणा।
झुणा म्हणजे लहान लेहंगा किंवा लहान लुगडें, आता इथे हा लेहंगा पैठणीपासून बनवला आहे का हे रंगीत पातळच पैठणला विणले गेलेय हे लक्षात येत नाही. पण ही नायिका बालवयीन आहे हे ‘झुणा’वरून लक्षात येते.
आणखी एका लावणीत हा झुणा सापडतो. शाहीर धोंडीबापू, ‘सुंदरा म्हणे दिलबरा..’ या लावणीत म्हणतात,
शालजोडी गोऱ्यापणा, आहो बाई जी जी
हातिं रूमाल बारिक झुणा, आहो बाई जी जी
यातले शालजोडी हे वस्त्र प्रतिष्ठेचे प्रतीक होते. शालजोडी म्हणजे लोकरीची दुहेरी शाल. या काश्मीरमध्ये विणल्या जात आणि दिल्ली बाजारपेठेतून पुण्यास येत.
आपल्या सुप्रसिद्ध लावणी, ‘सुंदरा मनामधिं भरलि’मध्ये शाहीर राम जोशी एका श्रीमंत सरदार स्त्रीच्या रूपाचे वर्णन करताना म्हणतात,
चालते गजाची चाल
लड सुटली कुरळे बाल
किनखाप अंगिचा लाल
हिजपुढें नको घनमाल
यात ही नायिका किनखाप या उंची वस्त्राची चोळी ल्यायली आहे. किनखाप म्हणजेच बनारसची शान असणारे झगझगीत ‘कमख्वाब किंवा किमख्वाब’ हे वस्त्र. पेशवाईमध्ये दरबारात खास अतिथींच्या स्वागत व सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या नजराण्यात किनखापाचा समावेश असायचा.
शाहीर विश्वनाथ याच्या लावणीत काही वस्त्रांचे संदर्भ आले आहेत.
बराणपूर पैठण थेट पोशाख आणिला तेथून।
अंगाबाणी चंदेरी महामुद्य सांगितल्या म्या आतून॥
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर हे ठिकाण तलम सुती कापड आणि जरतारी वस्त्रांसाठी प्रसिद्ध होते. अंगाबाणी हे फुले आणि कशिदा काढलेले अंगरख्याचे एक विशिष्ट सुती वस्त्र होते. तर महामुद्य हे सुद्धा एका प्रकारचे सुती वस्त्र होते, हे तलम असूनही घट्ट विणीचे असायचे. त्यामुळे हे अंगरखा शिवण्यासाठी वापरले जायचे. महामुदीशिवाय औरंगाजेबी व जाफरखानी ही वस्त्रेही व्यक्तींच्या नावावरून प्रसिद्ध होती.
सिदराम लहरी या शाहिराच्या एका लावणीमध्ये ‘पिशवाज’ नावाच्या एका वस्त्राचा उल्लेख आला आहे. हा जाकीटवजा पोशाख असून तो कलावंतिणी घालत असत.
इतक्या विविध पद्धतीने मराठी लावण्या वस्त्रवैभवाने नटल्या आहेत. वस्त्रांच्या संदर्भानी, उल्लेखांनी, प्रतिमांनी, उपमांनी लावण्या समृद्ध व सुंदर झाल्या आहेत. तसेच तत्कालीन जीवनशैली, सौंदर्याच्या कल्पना, पोशाखाच्या पद्धती जाणून घ्यायच्या असतील तर लावण्यांच्या अभ्यासाला पर्याय नाही. अशा सौंदर्यवेधी शाहिरांचे आपण उपकारच मानले पाहिजेत.
viva@expressindia.com