पैठणीच्या साडय़ांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘राणेज पैठणी’ यांनी पावसाळ्यानिमित्त पैठणी छत्र्या बाजारात आणल्या आहेत. या कल्पनेबद्दल ‘राणेज पैठणी’चे निनाद राणे सांगतात, ‘आपली मराठमोळी पैठणी भारताच्या उत्तर – दक्षिण भागात जास्त प्रचलित व्हावी याकरता पैठणीच्या विविध वस्तू बाजारात आणण्याचा आमचा मानस आहे?. पावसाळ्याच्या निमित्ताने या नवीन पैठणी छत्र्या आम्ही बाजारात आणल्या आहेत. करोनाच्या काळात काहीतरी चांगलं करावं यातून ही संकल्पना पुढे आली, यामुळे रोजगारालाही चालना मिळाली आहे. या छत्र्या सर्व ऋतूमध्ये वापरण्याजोग्या आहेत’. ‘राणेज पैठणी’ यांनी तयार केलेल्या या छत्र्या १,१०० रुपये किं मतीच्या आहेत. पैठणी छत्र्यांचा रंग, नक्षी आणि साईजबद्दल बोलताना निनाद राणे म्हणाले, ‘आम्ही पैठणीच्या पदरावरील नक्षी हॅण्ड पेंटिंगने रंगवली आहे यात कुठल्याही डिजिटल पेंटिंगचा उपयोग केलेला नाही. बाहेर इतर डिझाईन पेंटिंग केलेल्या छत्र्या या दोन हजारच्या रेंजमध्ये असतात, परंतु आमची ही अस्सल पैठणी छत्री अकराशे रुपयांपर्यंत ठेवली आहे. या पैठणी छत्र्यांवर केलेलं हॅण्ड पेंटिंग हे चांगल्या दर्जाचे आहे. लोकांना असाही प्रश्न पडतो की पावसाळ्यात या छत्र्यांवर केलेले पैठणीचे रंगकाम खराब झाले तर? परंतु या छत्र्यांवरील पेंटिंग हे उत्कृष्ट दर्जाचे आहे, त्यातील वापरलेले रंग कायमस्वरूपी आहेत, अशी ग्वाही निनाद राणे यांनी दिली. या छत्र्यांसाठी प्रमुख प्लेन रंग घेऊन उदाहरणार्थ लाल, जांभळा, निळा, गुलाबी त्यावर हाताने केलेल्या रंगकामातून पैठणी छत्रीवर उतरवली आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर अशा महाराष्ट्रातील सर्वच भागातून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. स्त्री आणि पुरुष या सर्वच वयोगटातील तसेच तरूण आणि वृद्ध व्यक्तींकडूनही या छत्र्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, तसेच पुरूष गटाला काळ्या रंगांच्या आणि लांब उंचीच्या पैठणी छत्र्या अधिक पसंत पडल्याचं निनाद राणे नमूद करतात. या छत्र्यांचा वापर प्रामुख्याने लग्नसमारंभांसाठी होतो आहे तसेच इव्हेंटच्या निमित्तानेही लोक  ही छत्री घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना ही छत्री हवीहवीशी वाटते आहे, असंही त्यांनी सांगितलं.