मन:स्पंदने: मनातील अढी, संवादाला कडी!

एकदा आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल नकारात्मक विचार यायला सुरुवात झाले की, अशा विचारांची ट्रेनच्या न संपणाऱ्या डब्यांसारखी एक रांगच लागते.

मृण्मयी पाथरे
एकदा आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल नकारात्मक विचार यायला सुरुवात झाले की, अशा विचारांची ट्रेनच्या न संपणाऱ्या डब्यांसारखी एक रांगच लागते. पण अशा नकारात्मक विचारांच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
अवनी आणि अवंतिका, दूरच्या नात्यातील बहिणी असल्या तरी लहानपणापासून एकत्र वाढल्या आणि खेळल्या. त्यांचं अगदी एकमेकांशिवाय पानही हलायचं नाही. त्या कुठेही फिरायला जाताना एकत्र जायच्या, मनसोक्त हिंडायच्या आणि जीवनाची मजा घ्यायच्या. पुढे त्या मोठय़ा झाल्यावरसुद्धा एकमेकांसोबत सारं काही शेअर करायच्या. पण त्यांच्या आजूबाजूची मंडळी त्यांच्या चालण्या-बोलण्याची, परीक्षेत मिळालेल्या गुणांची, बक्षिसांची आणि अगदी पगाराचीसुद्धा तुलना करायचे. अवनी कशी सगळय़ाच गोष्टींमध्ये सरस आहे, याची चर्चा दर फॅमिली गेट टुगेदरमध्ये व्हायची. या तुलनेचा त्यांना आधी फार काही त्रास होत नसला, तरी पुढे त्यांचं लग्न झाल्यावर आणि त्यांना मूल झाल्यावरसुद्धा ही तुलना करणं थांबलं नव्हतं. हळूहळू त्याही नकळतपणे स्वत:ची तुलना एकमेकींशी करू लागल्या आणि आपल्यात कोण वरचढ याचे आडाखे बांधू लागल्या. या दोघींचे बिघडलेले संबंध बघून त्यांच्या मुलांमध्ये आणि जोडीदारामध्येही फूट पडू लागली. त्यांच्या नातेवाईकांचा गोतावळा सारखाच असल्यामुळे आपली बाजू आधीच मांडून कोणाला आपल्याकडे वळतं करता येईल, याचं प्लॅनिंगही सुरू झालं. यामुळे त्यांच्या कुटुंबातही दोन गट पडायला सुरुवात झाली. त्यांच्या मनातील आपुलकीची जागा हळूहळू मत्सराने घेतली. कालांतराने या दोघींच्या संवादातील दरी कोणत्या ना कोणत्या कारणांनी वाढत गेली.
तसं म्हणायला गेलं तर त्यांच्या वादाची कारणं तशी इतरांना लहानच वाटतात, पण जी व्यक्ती या अनुभवांतून जाते तिला मोठीही वाटू शकतात. मतभेदांची पण एक गंमत असते – कधी कधी आपण कोणाशी भांडतोय, का भांडतोय, हे भांडण नेमकं कुठून सुरू झालं आणि कुठे येऊन पोहोचलंय याचं आपल्याला भानच राहात नाही. एकदा आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल नकारात्मक विचार यायला सुरुवात झाले की अशा विचारांची ट्रेनच्या न संपणाऱ्या डब्यांसारखी एक रांगच लागते. पण अशा नकारात्मक विचारांच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या दरम्यान आपला मेंदूही आपल्या नकळतपणे आपल्यासोबत ट्रिक्स खेळत असतो. ज्या व्यक्तीशी भांडण होते आहे त्या व्यक्तीचे इतर कितीही गुण आपल्याला माहिती असले, तरी आपली गाडी मात्र त्यांच्या अवगुणांवर येऊनच अडते. याला निगेटिव्हिटी बायस (negativity bias) असंही म्हटलं जातं.
या लहानमोठय़ा कुरबुरींचा आणखी एक पैलू आहे – आपण अनेकदा आपलं आयुष्य ‘ब्लॅक अँण्ड व्हाईट’ पद्धतीने जगत असतो. आपल्यासमोर असलेली एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा नातं एकतर चांगलं आहे किंवा वाईट आहे, परफेक्ट आहे किंवा इम्परफेक्ट आहे, असं मूल्यमापन करून आपण लगेचच मोकळे होतो. या मूल्यमापनाचे निष्कर्षसुद्धा व्यक्तीनुसार बदलत जातात. यात एखादा ग्रे एरियासुद्धा (gray area)असू शकतो, याचा आपण फार कमी वेळा विचार करतो. ही गोष्ट आपल्या नात्यांनाही लागू होते. आपले विचार एखाद्या व्यक्तीसोबत (मग ती व्यक्ती कोणीही असो – अगदी आई-बाबा आणि जोडीदारापासून ते मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील मंडळी आणि दूरच्या नातेवाईकांपर्यंत) पटले नाहीत, तर त्यांना मतभेद (difference in opinions) मानण्याऐवजी आपण कित्येकदा भांडणाचं स्वरूप देतो. मग त्यातूनच हेवेदावे, अबोला आणि रुसवे-फुगवे वाढत जातात.
या ‘ब्लॅक अँण्ड व्हाईट’ विचारपद्धतीमुळे आपण अनेकदा स्वत:कडून आणि इतरांकडून खूप अनरियलिस्टिक अपेक्षा ठेवतो – ‘माझ्याशी कधीच कोणी असहमती (disagreement)दर्शवू नये’, ‘माझं नेहमीच बरोबर असतं’, ‘जर कोणाला माझे विचार पटले नाहीत, तर त्या व्यक्तीतच दोष आहे’ असे अनेक टोकाचे निष्कर्ष काढले जातात. आपण सगळेच जण मोठे होत असताना आपले विचार, तत्त्वं, वागणूक विकसित करत असतो. हा विकास होत असताना काही जण ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ हा विचार अंगीकारून स्वत:ची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता तयार करतात; तर काही जण ‘लेट्स गो विथ द फ्लो’ असं म्हणत आजूबाजूचे इतके सगळे लोक एखादी गोष्ट सांगत आहेत तर त्यांचं बरोबरच असणार असा विचार करू लागतात. अनेकदा या दोन्ही विचारसरणीचे लोक जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्यात खटके उडू लागतात, तेव्हा त्यांचं नातं कसं वाईट, बिघडलेलं किंवा कलुषित आहे, असे शिक्के लावणं खूप सोपं असतं. अशा वेळेस एकमेकांशी अजिबातच न बोलणं किंवा एकमेकांबद्दलच्या तक्रारी किंवा गैरसमज इतर लोकांमध्ये पसरवणं यांसारखे पर्यायही सुलभ वाटू शकतात. पण त्यातून आधीच तयार झालेल्या लहानशा भेगेची दरी निर्माण होते. आणि एकदा ही दरी वाढली की तिला बुजवणं अवघड होऊन बसतं.
मुळात सगळीच माणसं कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात कळत-नकळत चुका करतात आणि ते साहजिकच आहे. पण या चुका मान्य करायला, एकमेकांचे विचार आणि भावना समजून घ्यायला आणि मतभेदांना पूर्णविराम द्यायला समंजसपणा लागतो. त्यामुळे यात चूक कोण आणि बरोबर कोण हा वाद दूर ठेवून झालेल्या चुका यापुढे पुन्हा रिपीट होणार नाहीत, याची काळजी घेतली तर कदाचित ते नातं टिकूही शकतं. आपल्यापैकी प्रत्येक जण स्वत:चं आणि इतरांचं आयुष्य एका वेगळय़ा चष्म्यातून पाहात असतो. कधी कधी काही जण या चष्म्यावर बसलेली बऱ्या-वाईट अनुभवांची धूळ वेळोवेळी साफ करत असतात, मात्र काही जण हा धूळ बसलेला चष्मा वर्षांनुर्वष वापरतात. त्यामुळे समोर घडणाऱ्या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी चष्म्यावर साठलेल्या धुळीमुळे त्यात काही ना काही दोषच दिसत राहातात. काही वेळेस काही जणांच्या चष्म्यावर धूळीऐवजी मखमली पदडासुद्धा असू शकतो. या पडद्यामुळे समोरचा जरी चुकला तरी त्याला पाठीशी घातलं जातं. त्यामुळे आपल्या मनात जर अढी निर्माण झाली असेल, तर संवादाला लागलेली कडी उघडण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंगाकडे पाहाताना आपल्या चष्म्याची लेन्स कोणती आहे हे फार महत्त्वाचं आहे, नाही का?
ता.क. – हा लेख आपल्या सगळय़ांच्याच आयुष्यात कधी ना कधी होणाऱ्या लहानमोठय़ा मतभेदांवर भाष्य करतो. या लेखात कोणत्याही प्रकारच्या शारीरिक/ मानसिक/ लैंगिक छळामुळे होणाऱ्या भांडणांचं समर्थन लेखिका करत नाही.
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vibrations mind stubbornness mind a link to communication negative person occasion train of thought conscious effort amy

Next Story
हायपर तरुणाई
फोटो गॅलरी