सौरभ करंदीकर

जागतिक आकडेवारी सांगते की रणांगणावर शहीद होणाऱ्या प्रत्येकी २० सैनिकांमागे सरासरी १ सैनिक प्रशिक्षण घेताना मृत्युमुखी पडतो. अशा दुर्दैवी घटना ‘व्ही आर’च्या मदतीने कमी होत आहेत. लढाईचं आभासी वास्तव निर्माण करण्याबरोबरच ‘व्ही आर’ प्रत्येक सैनिकाच्या कामगिरीचं मूल्यमापन करू शकतं. सैनिकांचं कुठे चुकलं, ते टाळण्यासाठी काय करावं हेही सुचवलं जातं.

गेल्या लेखात व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी – आभासी वास्तव – या तंत्रज्ञानाच्या इतिहासाबद्दल आपण जाणून घेतलं. प्रत्यक्षात कुठेही न जाता, हेडसेटच्या साहाय्याने आपण एका वेगळ्याच आभासी विश्वात संचार करू शकतो, हेही आपण पाहिलं. जरी हे आभासी जग थक्क करणारं वाटलं तरी या (व्ही आर) तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी केला जात नाही. वैद्यकीय, संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रांत ‘व्ही आर’चा वापर कसा केला जातो ते आता पाहू या.

नुकताच नासाने  ‘मार्स २०३०’ नावाचा एक नवीन उपक्रम आखला आहे, ज्याअंतर्गत अंतराळवीरांना  मंगळ ग्रहावर दीर्घकाळ वास्तव्य करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी ‘व्ही आर’चा वापर केला जाणार आहे. केवळ अंतराळवीरांनाच नव्हे, तर तुम्हा आम्हालादेखील चंद्र, मंगळ यांच्या पृष्ठभागावर आभासी संचार करणं लवकरच शक्य होणार आहे.

वैद्यकीय विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठीदेखील ‘व्ही आर’चा उपयोग केला जातो. खरं तर हे प्रशिक्षण वर्षांनुवर्षे अनुभव आणि शस्त्रक्रियांच्या निरीक्षणानेच शक्य होतं. या गोष्टींना पर्याय नसला तरी ‘व्ही आर’च्या साहाय्याने ते अधिक खोलात जाऊन, रुग्णाचे आयुष्य धोक्यात न घालता दिलं जाऊ शकतं. २०११ साली डॉ. शफी अहमद यांनी कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली. जी एका त्रिमितीय, सभोवारचं चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्याने (३६० डिग्री व्हिडीओ) -टिपली गेली. आता ‘व्ही आर’ हेडसेटच्या साहाय्याने जगभरातील विद्यार्थी आणि इतर शल्यविशारद ती शस्त्रक्रिया पाहतात. त्यातून शिकतात. आणि ती शस्त्रक्रिया पाहताना जणू काही आपण त्या ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित आहोत, असं त्यांना वाटतं. वैद्यकीय शिक्षणाखेरीज नवीन प्रकारच्या शस्त्रक्रियांची माहिती करून घेणं आणि त्यांचा निर्धोक सराव करणं यासाठीदेखील ‘व्ही आर’ची मदत घेतली जाते.

जागतिक आकडेवारी सांगते की, रणांगणावर शहीद होणाऱ्या प्रत्येकी २० सैनिकांमागे सरासरी १ सैनिक प्रशिक्षण घेताना मृत्युमुखी पडतो. अशा दुर्दैवी घटना ‘व्ही आर’च्या मदतीने कमी होत आहेत. लढाईचं आभासी वास्तव निर्माण करण्याबरोबरच ‘व्ही आर’ प्रत्येक सैनिकाच्या कामगिरीचं मूल्यमापन करू शकतं. सैनिकांचं कुठे चुकलं, ते टाळण्यासाठी काय करावं हेही सुचवलं जातं. हवाई दलाच्या सैनिकांना फ्लाईट सिम्युलेटर तंत्रज्ञान वापरून इंधन, दारूगोळा, स्थावर मालमत्ता इत्यादींचा नाश न होऊ देता प्रशिक्षण दिलं जातं.

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे लॉकडाऊनदरम्यान पर्यटनक्षेत्रावर अनेक र्निबध आले आहेत. त्यातून बाहेर पडायचा एक मार्ग म्हणजे व्हच्र्युअल टुरिझम. ‘व्ही आर’च्या साहाय्याने पर्यटनस्थळांचा अनुभव देणं सहज शक्य आहे. हे थोडंसं ‘दुधाची तहान ताकावर’ भागवल्यासारखं आहे, पण घराबाहेर पडणं शक्यच नसेल तर करणार काय? लंडनमधील ब्रिटिश म्युझियम आता अनेक त्रिमितीय कॅमेऱ्यांच्या साहाय्याने चित्रबद्ध करण्यात आलं आहे. या संग्रहालयाचा प्रत्येक कानाकोपरा ‘व्ही आर’च्या माध्यमातून आता पाहता, अनुभवता येणं शक्य झालं आहे. पुरातन स्थळं, भग्नावशेष, जतन केलेल्या अनेक वस्तू ‘हात लावू नये, येथे बसू—चालू नये’ इत्यादी र्निबधांशिवाय आता अनुभवता येणं शक्य आहे.

२०१६ साली अ‍ॅमस्टरडॅम येथे जगातील पहिलं ‘व्ही आर’ चित्रपटगृह स्थापन झालं. या चित्रपटगृहात बसवलेल्या खुच्र्या स्वत:भोवती फिरणाऱ्या आहेत. ‘व्ही आर’ चित्रपट पाहताना प्रत्येक प्रेक्षकाने एकाच दिशेला पाहावं, असं बंधन अजिबात नाही. खरं तर करोनाकाळात चित्रपटांचा धंदा ओटीटी माध्यमातून चालू आहे. चित्रपटगृहांमध्ये जाणारे प्रेक्षक आता घरबसल्या चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत. परंतु रंगभूमीचं काय?

नाटकांचे प्रेक्षक सोशल डिस्टन्सिंग सांभाळून प्रेक्षागृहात बसले तरी त्यांच्या संख्येमुळे नाटकाचं अर्थकारण कोलमडून पडेल. या परिस्थितीत त्रिमितीय कॅमेऱ्यांच्या साहाय्याने नाटय़प्रयोगाचं ‘व्ही आर’-रूपांतर करणं आज उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं करणं सहज शक्य आहे. अशा व्हच्र्युअल प्रेक्षागृहात प्रेक्षक त्याच्या ‘व्ही आर’ हेडसेटद्वारे एकटाच उपस्थित असेल, परंतु एकाच नाटय़प्रयोगाला हजारो लाखो प्रेक्षक मिळू शकतील आणि ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड कालबाह्य़ होईल! कदाचित उद्या एखाद्या चित्रपटाचं किंवा अशा नाटय़प्रयोगाचं (विंगेतून) त्रिमितीय शूटिंगदेखील याच तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं प्रेक्षकांना खेचून आणेल.

फुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ आज प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत. नुकत्याच पाहिलेल्या युरोपिअन फुटबॉलच्या एका प्रसारणात प्रेक्षकांचा ‘रेकॉर्डेड’ गोंगाट ऐकल्याचं आठवतंय! त्रिमितीय कॅमेऱ्यांच्या साहाय्याने व्हच्र्युअल प्रेक्षकाला स्टेडियममधली हवी ती सीट पकडता येईल आणि सामन्याचा आनंद घेता येईल, अर्थातच वातावरणनिर्मितीसाठी पूर्वी ध्वनिमुद्रित केलेल्या आभासी गोंगाटात!

औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक परिस्थिती हाताळण्याच्या प्रशिक्षणामध्ये ‘व्ही आर’ची मदत घेतली जाते. ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यांची हाताळणी करताना उद्भवणाऱ्या अपघातांना कसं सामोरं जाता येईल? उंच इमारतींच्या निर्मितीदरम्यान कामगारांनी  सुरक्षिततेच्या उपाययोजनांची कशी काळजी घ्यावी? इत्यादींचं प्रशिक्षण आज ‘व्ही आर’च्या साहाय्याने दिलं जातंय. काळजी घेतली नाही, तर कामगार उंच इमारतीवरून कसे कोसळतील, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कसे प्राणघातक अनुभव येतील त्यांचा आभासी अनुभवदेखील याच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दिला जातो.

अनुभवासारखा दुसरा उत्तम शिक्षक नाही असं म्हणतात. शालेय विद्यार्थ्यांवर केलेल्या एका संशोधनात असं निदर्शनास आलं आहे, की पुस्तकाच्या पानावर छापलेल्या किंवा वर्गात शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टींपेक्षा ‘व्ही आर’च्या साहाय्याने घेतलेलं शिक्षण विद्यार्थ्यांच्या ३० टक्के  अधिक लक्षात राहातं. आभासी अनुभव स्मरणशक्ती वाढवतो, असाही युक्तिवाद समोर येतोय. या तंत्रज्ञानाचा वापर वाढला, मागणी वाढली, तर हेडसेट्स, त्रिमितीय कॅमेरे स्वस्त होतील आणि सर्वसामान्यांचं आयुष्य आभासी वास्तवाच्या वापराने अधिक समृद्ध होईल यात शंका नाही.

viva@expressindia.com