एखादं ध्येय ठरवून आपण वाटचाल सुरू करतो, त्यासाठी लागणारे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कधी कधी धडपड करूनही आपल्याला त्या निश्चित मार्गाने जाता येत नाही. अशावेळी निराश न होता सतत ध्येयाच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमचे ईप्सित कुठल्या ना कुठल्या मार्गाने पूर्ण होतेच. याची प्रचीती आत्तापर्यंत शंभरहून अधिक सापांना जीवदान देणाऱ्या, सापांविषयीची लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी झटणाऱ्या रोमा त्रिपाठी या तरुणीचा आत्तापर्यंतचा प्रवास लक्षात घेतल्यावर येते.
प्रत्येक सजीवामध्ये भावना असतात, हा विश्वास घेऊन निसर्गाशी आणि प्राण्यांशी नातं जपणारी रोमा त्रिपाठी आज वन्यजीव बचाव क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करते आहे. ‘वाईल्ड ॲनिमल अँड रेपटाईल्स रेस्क्यू फाउंडेशन’ या संस्थेत रेस्क्यूअर आणि वाईल्ड लाईफ एक्स्पर्ट म्हणून रोमा कार्यरत आहे. तिने आतापर्यंत शंभराहून अधिक सापांना जीवदान देऊन सुरक्षितपणे जंगलात सोडलं आहे. सर्पप्रेम एकप्रकारे तिच्या रोमारोमात भिनलं आहे म्हटलं तर नवल वाटू नये. अर्थात, सापांविषयी सर्वसामान्यांच्या मनातील भीती दूर करण्याचं कार्य तिने तसं थोडं उशिराच हाती घेतलंं, त्यासाठीही एक घटना कारणीभूत ठरली.
रोमा बालपणापासूनच निसर्गाशी जवळीक साधून होती. ‘मला लहानपणापासूनच प्राण्यांबद्दल आपुलकी वाटत आली आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे’ असं रोमा सांगते. रोमाचे आजोबा पशुवैद्यक असल्याने घरात नेहमीच प्राण्यांचा सहवास होता. त्यांच्याकडूनच दयाळूपणा आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा हवी हे शिकल्याचं ती सांगते. खरंतर, तेव्हापासूनच तिला आजोबांसारखं पशुवैद्यक होण्याची इच्छा होती, त्यासाठी तिने अभ्यासही केला. मात्र ते तिचं स्वप्न पूर्ण झालं नाही. तरीही निसर्गाविषयीची ओढ तिच्या मनात कायम राहिली. मग तिने आपला मोर्चा झूओलॉजी या विषयाकडे वळवला. झूओलॉजी विषयात बी. एस्सी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ‘बायोडायर्व्हसिटी अँड वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट’ या विषयात एम. एस्सी.चे शिक्षण घेतले. अर्थात, तिचा हा अभ्यासक्रमाचा काळ कोविडदरम्यानचा होता. त्यामुळे शिक्षण घेता घेता प्रत्यक्ष त्या क्षेत्रातील अनुभव तिला घेता आला नाही. मात्र, इच्छा तिथे मार्ग असतो, याची प्रचीती तिला लवकरच यायची होती.
वरवर छोट्याशा वाटणाऱ्या एका घटनेमुळे आयुष्य अंतर्बाह्य बदलून गेलं, असं रोमा सांगते. ‘एकदा माझ्या घराबाहेर मला हरणटोळ प्रजातीचा साप दिसला. तो झाडावर चढतच होता, इतक्यात शेजाऱ्यांनी भीतिपोटी त्याला ठार मारलं. त्या क्षणी मला खूप वाईट वाटलं. प्राण्यांविषयी विशेषत: सापांविषयी माणसांचं असलेलं अज्ञान, त्यातून निर्माण झालेली भीती आणि त्या भीतीमुळे निरपराध जीव मारले जात आहेत, या सगळ्याचा विचार करूनच मला खूप अपराधी वाटलं’, असं तिने सांगितलं. अर्थात, या घटनेनंतर तिच्या प्रवासाला कलाटणी मिळाली. या घटनेतून बोध घेऊन सापांविषयीचे गैरसमज दूर करत जनजागृती निर्माण करण्याची मोहीम रोमाने सुरू केली. ती ‘वाईल्ड ॲनिमल अँड रेपटाईल्स रेस्क्यू फाउंडेशन’ या संस्थेत सहभागी झाली. या संस्थेबरोबर काम करत असताना योगेश कांबळे (अध्यक्ष) आणि प्रेम आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सापांची ओळख, सर्पदंश प्रतिबंध, बचाव तंत्र, लोक व्यवस्थापन आणि वन्यजीव कायदे यांचा तिने सखोल अभ्यास केला. कळवा वन विभागाच्या मदतीने त्यांनी अनेक वन्यजीव बचाव मोहिमांमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये विठ्ठलवाडीतील इमारतीत अडकलेल्या बिबट्याच्या बचाव मोहिमेचाही समावेश आहे.
रोमा सध्या स्वतंत्रपणे रेस्क्यू ऑपरेशन्स हाताळते आहे. याचबरोबर शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात जनजागृती सत्रंही ते आयोजित करतात. रोमाने आत्तापर्यंत विषारी, बिनविषारी अशा शंभरहून अधिक सापांना जीवदान देऊन त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. सापांविषयीची जनजागृती करण्याबरोबरच रोमाने वन्यजीव गणना, वृक्ष लागवड मोहिमा, जखमी प्राण्यांची काळजी अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय, सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीतील वाढता वावर लक्षात घेऊन त्यादृष्टीने तिने अभ्यास सुरू केला आहे. कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने मानवी वस्त्यांमधील बिबट्यांच्या हालचालींचा अभ्यास ती करते आहे. या रोजच्या उपक्रमांबरोबरच रोमाने पुढच्या शिक्षणाचाही मार्ग निवडला आहे. सध्या ती एलएलबी करते आहे. जेणेकरून भविष्यात वन्यजीव संवर्धन आणि कायदे या क्षेत्रात तिला काम करता येईल. ‘आमचा संपूर्ण संघ कोणतंही वेतन किंवा निधी घेत नाही. केवळ प्राण्यांविषयीची आवड आणि निसर्गाप्रति वाटणाऱ्या जबाबदारीच्या भावनेने काम करतो’, असं तिने सांगितलं. एकीकडे टिटवाळा परिसरातील एकमेव महिला रेस्क्युअर म्हणून तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे, पण त्याचबरोबर तीच गोष्ट तिच्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे, असं ती सांगते. रोमाच्या कार्याची दखल घेत ‘वुमन ऑफ द वाईल्ड’ या प्रसिद्ध संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर तिची आणि तिच्या कार्याची दखल घेतली आहे. ‘विनॅचरलिस्टकडून २०२४ मध्ये एन्व्हायर्नमेंटल एज्युकेटर’ पुरस्कारासाठी तिला नामांकनही प्राप्त झालं आहे.
‘भीती आणि प्रशंसा यामधला फरक म्हणजे ज्ञान’ असं रोमा सांगते. लोकांना जेव्हा प्रत्येक सजीवाचं, त्यांच्या प्रजातीचं महत्त्व समजेल, तेव्हाच माणूस आणि वन्यजीवांमध्ये सहअस्तित्व शक्य होईल, असं निरीक्षण तिने नोंदवलं. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या मनात निसर्ग, वन्यजीव, निसर्गाचे छोटे छोटे घटक यांच्याबद्दलची सजगता निर्माण करणं हे तिने तिचं ध्येय ठरवलं आहे. रोमासारख्या युवा संशोधकांच्या या खारीच्या वाट्यातूनच भविष्यात पर्यावरण संवर्धनाचं काम मोठं होईल, हा विश्वास वाटतो.