१८ डिसेंबर रोजी झालेल्या ‘व्हिवा लाउंज’मध्ये सहभागी झाली होती. ‘लोकसत्ता’च्या रेश्मा राईकवार आणि अरुंधती जोशी यांनी शाल्मलीशी संवाद साधला. तिचं बालपण, बॉलिवूडमध्ये प्रवेश, शास्त्रीय संगीताची बैठक, फिल्मी आणि पाश्चिमात्य संगीताबद्दलची तिची मतं, इतर भाषिक गाणी अशा अनेक विषयांवर शाल्मली भरभरून बोलली आणि गायलीसुद्धा. तिचा मोकळेपणा उपस्थितांना भावला. तिचा आत्मविश्वास, तिचं भरभरून बोलणं, ‘मै परेशान’ या पहिल्याच गाण्याने अमाप यश देऊनसुद्धा तिचं अद्याप जमिनीवर असणं या सगळ्यावर प्रेक्षक फिदा झाले.
बॉलिवूडमध्ये एंट्री
प्लेबॅक सिंगिंग किंवा बॉलिवूडमध्ये जाऊन गाणी गाण्याचं माझं स्वप्न कधी नव्हतंच. ते योगायोगानं झालं नि इतकं चांगलं झालं कारण तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिलात. ‘इशकजादे’ चित्रपटातल्या एका गाण्यासाठी संगीतकार अमित त्रिवेदीला फ्रेश आवाज हवा होता. माझ्या इंग्रजी गाण्यांचे डेमो ऐकून मला ‘परेशान’ हे गाणं गायला अमित त्रिवेदीनं बोलावलं, हीच तेव्हा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अमितचं ते गाणं ऐकलं नि ते मला जसं गाता येईल, तसं गायलं. ते मी अमुक एका प्रकारे गाईन असा त्यामागं विचार खरं तर नव्हता. मी गायलेलं त्यांना आवडलं. ते रिलिज झाल्यावर तुम्हा रसिकांनाही आवडलं. तेव्हा मला प्लेबॅकबद्दल काही माहितीसुद्धा नव्हती. आज एक गायक म्हणून गाण्यातल्या माझ्या कॉन्ट्रिब्युशनविषयी विचाराल तर मला त्याचं निश्चितच उत्तर देता येईल. पण ‘परेशान’च्या वेळी मात्र जसं सांगण्यात आलं, तसं मी गायले. त्यात माझं टेक्निकली फारसं कॉन्ट्रिब्युशन नाहीये.
मूल्यांची जपणूक
मूल्यांची जपणूक करायला माझ्या बाबांनी मला शिकवलं. ‘सुख असो किंवा दुख असो, हेही बदलेल,’ हा जणू कानमंत्रच त्यांनी मला दिला. सकारात्मकतेनं वागायला शिकवलं. कोणत्याही गोष्टीचा अट्टहास न धरता त्यातल्या बदलाला सामोरं जायला
त्यांनी मला तयार केलं.
गवयाचं पोर सुरात रडतं..
माझी आई उमा खोलगडे माझ्या वेळी आठव्या महिन्यांची गरोदर असेपर्यंत श्रुती सडोलीकर यांच्याकडं गाणं शिकायला जात होती. ती म्हणते की, ‘तेव्हा मी गाणं शिकले नसते तर तू पुढं गाणं गायलीही नसतीस.’ कदाचित त्याचा काहीतरी प्रभाव कुठंतरी असेल. पण त्याखेरीज लहानपणी संगीताचा तासभर रियाज करायचाच अशी एक प्रकारची सक्तीच आईनं केली होती. त्यावेळी मला ते फारसं आवडायचं नाही. ते आईला माहीतही होतं. माझ्यापेक्षा आठ वर्ष मोठा असलेला माझा भाऊ सुधन्वा तेव्हा घरात इंग्रजी गाणी ऐकायचा, मित्रांसोबत गिटार वाजवायचा. मला त्यांच्या टीममध्ये जायचं असायचं. पण तो तास संगीताला द्यावाच लागायचा. त्यामुळं माझा थोडासा बेस तयार झाला. त्यासाठी मी आईची कायम ऋणी राहेन. त्या वयात चांगलं काय नि वाईट काय, यातला फरक आपल्याला कळत नाही. पालकांना ते मुलांना समजावता यायला हवं. माझे आईबाबा खंबीरपणं माझ्या पाठीशी उभे आहेत.
मी पाश्चात्त्य संगीत ऐकून ऐकूनच शिकले. कॉलेजमध्ये खूप काही ऐकायचे-गाण्याचे प्रयत्न केले. मला अमेरिकेत पाश्चात्त्य संगीताचं शिक्षण घ्यायला जायचं होतं. म्युझिक थिअरी शिकायची होती. पण ‘परेशान’ची ऑफर आली नि एल ए म्युझिक अॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळूनही तिथे जाता आलं नाही. अजूनही मला ते शिकायचंय. कारण गाणं शिकताना त्यामागचं नेमकं तत्त्व काय आहे, हे जाणण्याची खूप उत्सुकता मनात आहे. हे शिकणं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अॅवॉर्डस् वगरे मिळून सुख लाभत नाही. त्या थिअरीच्या बेसवर मी संगीतातला पुढचा टप्पा गाठू शकेन. पहिल्याच गाण्यासाठी पुरस्कार मिळाला, तरी हे पुरस्कार महत्त्वाचे नाहीत. पुरस्कारांमुळं कुटुंबीयांना समाधान वाटलं तरी त्यामुळं माझ्या ज्ञानात भर पडत नाही. मग मी अस्वस्थ होते.
करिअरची फर्स्ट स्टेप
शाळेत असल्यापासून डान्स, पेंटिंग, अॅिक्टग, सिंिगग या गोष्टी मी शिकले नि शिकत्येय. मी नूतन पटवर्धनांकडं कथक शिकत्येय. वामन आणि गौरी केंद्रे यांच्याकडे नाटकाचं प्रशिक्षण घेतलंय नि पेंटिंगही मी सतत करत आलेय. ‘सेंट झेव्हिअर्स’मध्ये आर्टसला अॅडमिशन घेतली तेव्हा मला म्युझिकमध्येच काहीतरी साध्य करायचं हे ठरलेलं होतं. कॉलेजमध्ये मी सतत ऑडिशन्स द्यायचे. सोलो सिंिगग, ड्रामा आदी अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळं म्युझिकमधला माझा ऑनस्टेज एक्सपिरिअन्स वाढू लागला. बॅण्डबरोबर पब्ज नि क्लब्जमध्येही मी गायला लागले. तेव्हा मला जाणवलं की, मला संगीत सगळ्यात जास्त आवडतंय. यापुढे डान्स किंवा अॅिक्टग करायची संधी चालून आली तरी त्यात मला आणखी किती काय शिकता येऊ शकेल, हे मी आधी पडताळून पाहेन. पण त्यातही गाण्याबद्दल आणखी काही शिकता येईल का, तेही पाहेन. कारण गाणं मला प्राणप्रिय आहे.
गाण्याच्या शब्दांना महत्त्व
अलीकडे चित्रपटांतल्या गाण्यांमध्ये एक ‘कॅची फ्रेज’ असणं आवश्यक झालंय. भले मग त्या शब्दांना काहीच अर्थ नसला तरी चालतं. पण माझ्या मते शब्द हा गाण्याचा आत्मा असतो. म्हणूनच मी गाणं निवडताना मी त्यातल्या शब्दांना महत्त्व देते. बाकी गोष्टींना दुय्यम स्थान देते.
शास्त्रीय संगीताची बठक
बॉलिवूडमध्ये गाणाऱ्या गायकांना शास्त्रीय संगीताची बठक असणं आवश्यक आहे. फक्त तेच नाही, पण इतर कोणत्याही प्रकारच्या संगीताचं थोडंतरी शिक्षण गायकानं घेणं आवश्यक आहे. कारण सगळेच संगीत प्रकार अतिशय समृद्ध आहेत नि त्यातलं थोडं आपण शिकलं पाहिजे.
बी.ए.नंतर पाश्चात्त्य संगीत शिक्षणासाठी मी अमेरिकन विद्यापीठांत अर्ज केला होता. तिथं जाऊन ऑडिशन द्यायला लागतात. त्याऐवजी मी माझं रेकॉर्डिग.. त्याचे ऑडिओ-व्हिज्युअल्स पाठवले होते. ते पाठवल्यावर आठवडाभरात माझ्या मित्राचा अमित त्रिवेदींकडच्या कामासंबंधात फोन आला. त्यानं म्युझिक डेमो पाठवायला सांगितला. त्याच दिवशी रात्री १० वाजता त्यांनी फोन करून ‘रेकॉìडगला येशील का,’ अशी विचारणा केली. मी सॉलिड द्वंद्वात पडले.. ‘क्या करें क्या ना करें, ये कैसी मुश्किल भाई..’ चिक्कार फोनाफोनीनंतर जायचा निर्णय घेतला नि तो पथ्यावर पडला.
मी नव्या पिढीची आहे. हल्लीच्या संगीतामध्ये मेलडी हरवलीय, असं मला
नाही वाटत. उलट विभिन्न संस्कृतीतले
सूर एकमेकांत मिसळताहेत.
स्ट्रगल नाही..फक्त आंतरिक संघर्ष
‘परेशान’नंतर ‘लत लग गई’ आणि इतर गाणी माझ्याकडं आली. पण मला त्या किंवा इतर गाण्यांसाठी इतरांसारखा सॉलिड स्ट्रगल करायला लागला नाही. त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. संधी जणू आपोआप माझ्याकडे चालून येत होत्या. हा स्ट्रगल.. हा संघर्ष माझ्या वाटय़ाला आला नसला तरीही माझ्या मनातला आंतरिक संघर्ष अविरत सुरू आहेच. अल्पावधीत मिळालेलं यश उपभोगायचं की त्याची धुंदी बाजूला सारून नव्या जोमानं आणखी शिकायचं.. असं व्दंव्द मनात सतत चालू असतं..
नव्या दमाचा नवा सूर
माइकी मॅकक्लेरी हे म्युझिकमधलं एक मोठं नाव. त्यांनी ‘नौटंकी साला’ या चित्रपटासह अनेक जाहिरातींनाही संगीत दिलंय. त्यांच्यामुळं मला कळलं की, मला माझा आवाज कुठं नि कशा पद्धतीनं वापरता येईल. ‘द बारटेण्डर’ या आमच्या बॅण्डमध्ये आम्ही क्लासिक बॉलिवूड गाण्यांना कॉन्टेम्पररी फॉर्ममध्ये- नव्या ढंगात सादर करतो. जुन्या पिढीतल्या अनेकांना ते आवडत नाही, असं सांगत शाल्मलीनं ‘खोया खोया चांद’ गाण्यांचं प्रात्यक्षिक सादर करून रसिकांची दाद मिळवली. आवाजाचा पोत वेगळा असल्यानं त्याच पठडीतली गाणी मिळतील, असं वाटत नाही. हे सांगत तिनं आणखी दोन वेगळ्या ढंगातली गाणी सादर करत ‘माझा लिमिटेशनवर विश्वास नाहीये,’ असं ठासून सांगितलं.
जुन्या गाण्यांना नव्या ढंगात सादर करणं काहींना पटत नाही. पण त्यानिमित्तानं जुनी गाणी पुन्हा गायली जाताहेत. अनेकांना ती आवडताहेत. विशेषत तरुणाईला जुन्यापेक्षा नवीन फॉरमॅटमध्ये ऐकायला ती आवडतात. आपल्याकडे एकूणच मेलडीला अधिक महत्त्व दिलं जातं. गायकाला केंद्रस्थानी मानलं जातं. पण गायकाइतकाच किंबहुना थोडाबहुत अधिक महत्त्वाचा वाद्यमेळही असतोच. तो नीट नसेल तर गायकाच्या गाण्याला चारचाँद कसे काय लागणार ? वाद्यमेळालाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. गायक म्हणून मला जुनी गाणी फारशी माहीत नाहीत. मराठीतली ‘शुक्रतारा’, ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘फुलले रे क्षण’ अशी बोटावर मोजण्याइतकी गाणी मला माहित्येत. पण इंग्रजीतली जुनी सगळीच गाणी माहित्येत.
िहदी चित्रपटांचा बदलता ट्रेण्ड
िहदी चित्रपटांचा ट्रेण्ड बदलतोय. तो बदलायलाच हवा. आपण सध्या जे संगीत ऐकतोय, त्यात एक प्रकारचा साचेबद्धपणा आलाय. संगीतात आवाजाचा पोत आणि गाण्यातले भाव या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मी माझ्या आवाजाच्या पोताचं तर काही करू शकत नाही, पण भावनांवर मी काम करू शकते. पण गेली काही दशकं आपण काहीसे एकाच पठडीतले आवाज ऐकतोय. आता मेलडी नि आवाजाचा पोत बदलल्यानं गाणी नवीन वाटताहेत. तर जुन्या पिढीतल्या लोकांना आताच्या गाण्यातली मेलडी हरवलेली वाटते. पण मला तसं वाटत नाही. मी या पिढीतली आहे. इंटरनेट, सोशल मिडिया वगरे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळं विभिन्न संस्कृतीतले सूर एकमेकांत मिसळताहेत नि हा बदल घडतोय. हे संक्रमण स्थिरावायला थोडा अवधी लागेल, पण बदल हा नेहमी चांगला असतो.
लिहिता हात
मी माझी गाणी कंपोज करते, काही इंग्रजी गाणी लिहितेही. हे खरंय. पण माझा गळा गाता असला तरी हात फार चांगला लिहिता आहे, असं मला वाटत नाही. माझ्या लिखाणातल्या काही त्रुटींवर मात करायचा, त्या सुधारायचा मी प्रयत्न करत्येय. त्यात मला माझी मित्रमंडळींची कायमच साथ लाभते. हातपाय गाळून न बसता, या प्रयत्नांत सातत्य राखते. एक दिवस संपूर्णपणे माझं गाणं मी तुम्हांला नक्कीच ऐकवेन..
बॅण्डमधला परफॉरमन्स..
आमच्या बॅण्डमध्ये ड्रम, गिटार, कीबोर्ड आदी वाद्यं नि गायकांचा समावेश असतो. त्यातल्या टीमवर्कमध्ये गाणं कसं जन्माला येतं, ते अलगदपणं कळतं.. वादक आणि गायकांना आपापली कला सादर करायला आवश्यक तो अवकाश देता येतो. एकमेकांच्या कलेला दाद देता येते. लाइव्ह शोमध्ये गिव्ह अॅण्ड टेक करता येतं. पण बऱ्याचदा आम्हाला जे सादर करायचं असतं, ते लोकांना ऐकायचं नसतं. प्रेक्षक पहिल्या गाण्यापासूनच ‘बलम पिचकारी’ वगरे ओरडून तेच ऐकवायची मागणी करतात.. मग ते ऐकवावंच लागतं. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मला स्वतला स्लो साँग्ज गायला आवडतात. अर्थात तशी गाणी मी अजून बॉलिवूडमधील चित्रपटांसाठी रेकॉर्ड केलेली नाहीत.
आवाजाची काळजी नि प्रेरणा
आपल्या आवाजाची काळजी घेण्याच्या दृष्टीनं डेअरी प्रॉडक्टस्, कोल्डिड्रक्स वगरे गोष्टींचा मोह टाळलेला बरा. पण बाकी काही डाएट वगैरेच्या फंदात मी पडत नाही. माझी आवडती गायिका एमी वाइनहाऊस मला कायमच प्रेरणादायी ठरल्येय. ती अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी गेली. तिचं संगीत अवीट आहे. हृदयस्पर्शी आहे. माझं गाणं लोकांना आवडेल की नाही, अशी चिंता तिच्या गाण्यात दिसत नाही नि हेच मला आवडतं. आतला आवाज ऐक, उगाच लोक काय म्हणतील, याचा विचार करू नकोस. तसं केलं तर आपल्याला आपलं ध्येय गाठण्यात अडथळेच अधिक येतील. हे अडथळे पार केले तर आपलं ध्येय साध्य करता येईल, असा विचार एमी वाइन हाऊसच्या संगीतातून मला प्रतीत होतो.
स्क्रिनपर कौन..
पडद्यावर कोणती नटी मी गायलेलं गाणं अभिनित करणारेय, हा विचार करणाऱ्या जनरेशनची मी नाहीये. माझ्या गाण्याचं काम त्या स्टुडिओमध्ये संपतं. मी त्या गाण्याशीच कनेक्ट होते. शिवाय त्या त्या नटीला माझा आवाज सूट होणार, म्हणूनच तर त्या गाण्यासाठी माझी निवड झालेली असते. अमुक नटीसाठी मी चांगलं गावं, असा विचार मी करत नाही. तर मला मिळालेलं हे उत्तम गाणं आहे नि मी शंभर टक्के चांगलं गायला हवं, असा विचार मी करते.
ऐका तर खरं..
भारतीय व पाश्चात्त्य संगीतातला फरक तिनं प्रात्यक्षिकांसह उलगडून दाखवला. त्यातल्या तांत्रिक गोष्टी, वाद्यांचा वापर, त्यातली हार्मनी, वाद्यांचं संगीतातलं स्थान आदी मुद्दय़ांचा तिनं आढावा घेतला. मी फारशी िहदी चित्रपटगीतं ऐकलेली नाहीत. आपण किती नि कोणकोणत्या प्रकारचं संगीत ऐकतो, यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. एकाच पठडीतलं संगीत सतत ऐकत राहिलात तर उपयोग नाही. सातत्यानं ऐकणं आणि सध्याच्या संगीत प्रवाहाची माहिती असणं, ही आवश्यक गोष्ट आहे.
आवडतं गाणं
नुकतंच मी साऊथ आफ्रिकेतील शोमध्ये नेल्सन मंडेलांना श्रद्धांजलीपर एक गाणं समíपत केलं. ते गाताना मला कळलं की, गाण्यातले एक्स्प्रेशन किती महत्त्वाचे असतात. ते गाणं गाता गाता लोकांना रडवलं नि मीही रडले.. ते गाणं होतं सायमन अँण्ड गारफुंकेल यांचं ब्रिज ओव्हर ट्रबल्ड वॉटर.. हे गाणं. शाल्मलीनं लाउंजमध्ये आवडीचं गाणं म्हणून हेच गाणं सादर केलं. शिवाय ‘पुणे ५२’ या मराठी चित्रपटातलं ‘जग सारे बदले’.. हे तिचं आवडतं गाणंही ती गायली.
भाषा माझी लाडकी
दाक्षिणात्य भाषेतील गाणी गाताना काही अडचणी येतात. त्यांचे शब्दोच्चार करणं कठीण जातं. ते जमलं तर गाणं नीट गाता येतं. भाषा कळल्यावर ते गाणं आपलंसं होऊन जातं. काही वेळा भाषा कळली नाही, तरी ती समजून घेऊन मी ही गाणी गाते. आपल्याला आयुष्यात काही गोष्टी कशा जमतील असं वाटतं, पण त्या गोष्टी फारशा अवघड नसतात. त्या आत्मसात करता येतात. मला मुळातच भाषेबद्दल प्रेम वाटत असल्यानं निरनिराळ्या भाषा, त्यातले शब्द, त्यांचे उच्चार, त्यांचा नाद, त्यांची माहिती नि उच्चारण जाणून घ्यायला आवडतं. गाणं समजून घेऊन गायला हवं. ‘प्राग’ या चित्रपटातलं एक चेक भाषेतलं गाणं मी त्या चित्रपटाच्या गाण्यांच्या प्रमोशनसाठी िहदीत डब करून गायल्येय. मजा येते हे सगळं करताना.
आवाज चोरून गाऊ नका
वरच्या पट्टीत आवाज चोरून लावला जातो की नसíगकपणं, हा चांगला प्रश्न आहे. आपण हाय स्केलमध्ये गातो, तेव्हा तो आवाज सहजपणं लावला जातो. तो तसाच लागला पाहिजे. तो चोरून लावू नका. आवाजाचा योग्य प्रकारे उपयोग होण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबींची माहिती घ्या. आजच्या जमान्यात आपण कुणासारखं गायचा प्रयत्न केला तर उपयोग नाही. त्यापेक्षा आपला आवाज नि त्याची क्षमता ओळखून गा. स्वत:चं गाणं गा.
रिअॅलिटी शो. नकोच!
रिअॅलिटी शो ही संकल्पनाच मला आवडत नाही. हे शो त्या स्पर्धकांच्या डोक्यावरील ताण वाढवतात. त्यांच्यातली स्पर्धा-चढाओढ दिसते. संगीत ही स्पर्धा करण्याची गोष्ट नाही. शिकण्याची गोष्ट आहे. रिअॅलिटी शोच्या काळात स्पर्धकांना फार कमी गोष्टी शिकायला मिळतात. गायकांनी सतत शिकायला हवं. शोमुळं थोडीफार संधी मिळते, एक प्लॅटफॉर्म मिळतो. परीक्षकांकडून सूचना मिळतात. पण त्यातून फारसं काही निष्पन्न होत नाही. त्यामुळं मी रिअॅलिटी शोचा कधीच विचार केला नाही. मी स्पध्रेला घाबरत नाही. पण मला स्पर्धा करायचीच नाहीये. मी आज दिवसभरातल्या प्रॉडक्टिव्ह गोष्टींनाच प्राधान्य देते.
करिअरचा राजमार्ग
माझं नशीब चांगलं असल्यानं मला फारसं स्ट्रगल करावं लागलं नाही. पण सगळेजण एवढे सुदैवी नसतात. पण प्रयत्नांची कास धरणं अजिबात सोडू नका. कारण आपली पॅशन कधी तरी कुणी तरी नोटीस करेलच. त्यामुळं आपली धडपड चालूच ठेवा.. एक दिवस असा उगवेल, जेव्हा तुम्ही म्हणू शकाल, ‘आजचा दिवस माझा’..
रिअॅलिटी शो मध्ये फक्त जीवघेणी स्पर्धा असते. मी स्पध्रेला घाबरत नाही.
पण मला स्पर्धा करायचीच नाहीये.
मी प्रॉडक्टिव्ह गोष्टींनाच प्राधान्य देते.