मी तेवीस वर्षांची आहे. आता शिक्षण पूर्ण होईल. माझ्या घरात आई-बाबा, दादा आणि वहिनी असं एकत्र कुटुंब आहे. माझ्या दादाचं आणि माझं अजिबात पटत नाही. आमचे विचार, स्वभाव, सगळंच फार वेगळं आहे. अशा काही घटना घडल्या आहेत की मी त्याच्या वक्तव्यानं हर्ट झाले आहे, ज्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी किंचितही प्रेम उरलेलं नाही आणि मोठा आहे म्हणून त्याचा आदरही वाटत नाही. तो आसपास असला की निगेटिव्ह वातावरण निर्माण होतं. एकदा विचार केला की बोलून कॉन्फ्लिक्ट्स दूर करू या, पण त्याचा काही फायदा होणार नाही हे जाणवलं. कारण आपण जुनं विसरू शकतो, पण माणसाला बदलू शकत नाही. मी अव्हॉयडन्स स्ट्रॅटेजी वापरतेय, पण मला त्याच्यासोबत फार काळ जमवून नाही घेता येणार असं वाटतंय. अजून काय करता येईल मला?
भाग्यश्री

हॅलो भाग्यश्री, तू कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतेयस? तुमचं एकत्र कुटुंब आहे. घरातल्या इतर सदस्यांबरोबर तुझं कसं रिलेशन आहे? आई-बाबा जॉब करतात की रिटायर झालेत? त्यांच्या शब्दाला घरात कितपत वजन आहे? की भाऊच सगळे निर्णय घेतो? तुझ्या आणि भावाच्या वादाची त्यांना कल्पना आहे का?
मोठय़ा भावाचं नातं म्हणजे एक विश्वासाची जागा असते. आधार वडिलांसारखा असतो पण तितका धाक नसतो. शिवाय ती जनरेशन गॅपही नसते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी शेअर करता येतात ज्या आपण वडिलांशी बोलू शकत नाही. साहजिकच भावाकडून, विशेषत: मोठय़ा भावाकडून आपल्या काही अपेक्षा असतात. त्यानं आपल्यावर विश्वास ठेवावा, शांतपणे आपलं ऐकून घ्यावं, जबाबदारीनं सल्ला द्यावा आणि मुख्य म्हणजे आपण जरी वेडय़ासारखं, बेजबाबदारपणे वागलं तरी त्यानं मॅच्युरिटी दाखवून आपल्याला समजून घ्यावं. या सगळ्या चित्राला तुझ्याबाबतीत जबरदस्त धक्का बसलेला दिसतोय. त्याच्या काही वक्तव्यानं हर्ट झाल्याचं तू लिहिलंयस. म्हणजे जो काही दुरावा निर्माण झालाय, त्याचं कारण मुख्यत: शाब्दिक आहे. तुझ्याविरुद्ध कुठलं वाईट कृत्य त्यानं केलेलं दिसत नाही. त्याची बोलण्याची पद्धत चुकीची आहे का? तुझ्याव्यतिरिक्त इतर कुणाला त्यानं हर्ट केलंय का? तसं असेल तर तू त्याचं वागणं पर्सनली घेऊ नकोस. कारण स्वभावाला औषध नसतं. तू लिहिलंच आहेस की माणसाला बदलता येत नाही.
सध्या तू कॉलेजच्या निमित्तानं बराच वेळ घराच्या बाहेर असशील. एकदा ते संपलं की नोकरी किंवा पुढचं शिक्षण आहेच. भाऊही नोकरी करत असेल. त्यामुळे तसाही तुमचा एकमेकांशी फारसा संपर्क येत नसेल. शक्यतो इतर लोक आजूबाजूला असताना त्याच्याशी बोलायचा प्रयत्न कर, म्हणजे बिटरनेस काहीसा माइल्ड होईल. कितीही मनाविरुद्ध वाटलं तरी त्याला एखादं सरप्राइज दे. उदा. त्याच्या वाढदिवसाला एखादी गिफ्ट किंवा फेसबुकवर त्याच्याविषयी एखादी अ‍ॅप्रिशिएटिव्ह कमेंट टाकणं किंवा फॅमिली गेट-टुगेदरमध्ये सगळ्यांसमोर त्याच्याविषयी पॉझिटिव्ह बोलणं, इ. तुमच्या नात्यात आलेला अविश्वास, निगेटिव्हिटी विरघळायला याची मदत होऊ शकेल. काही मिसअंडरस्टँडिंग झालं असेल तर ते क्लीअर होईल. या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुझा इगो तर मधे येत नाहीये ना तेही बघ.
तुझ्या वहिनीशी तुझं चांगलं कम्युनिकेशन असेल तर तिच्यामार्फत तुझ्या भावना त्याच्यापर्यंत पोचवू शकतेस का ते बघ. अगदी पूर्णपणे इश्यू रिझॉल्व झाला नाही, तरी तहाची परिस्थिती आली तरी तुझ्यासाठी ते सुसह्य़ ठरेल.
शेवटी तुझं आयुष्य त्याच्या आयुष्यापासून टोटली वेगळं आहे. तू ते तुला हवं तसं प्लॅन करू शकतेस.
When our nails are grown, we cut the nails, not the fingers. Likewise, when there are misunderstanding, cut the pride, not the relationship.

विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.