रोजच्या नियमानुसार इंटरनेटसमोर बसणाऱ्या जगभरातील तरुणाईला अमेरिकेतील काही मुलींनी अपलोड केलेल्या फोटोनं चकित केलं. त्यांनी चक्क काखेतले केस रंगवलेले होते. बरं, केस लपवायचे म्हणून स्किन टोन किंवा लाइट शेडमध्ये केस रंगवण्याऐवजी ब्राइट नियॉन रंगांचा वापर केला होता. त्यामध्ये फ्लोरोसंट हिरवा, इलेक्ट्रिक निळा, फ्लोरोसंट पिवळा अशा रंगांचा समावेश होता. कित्येकींनी तर आपल्या कलर केलेल्या डोक्यावरच्या केसांच्या रंगाला मॅच होणाऱ्या रंगाने काखेतील केस रंगवले होते. या फोटोंमुळे जगभरातील फॅशनप्रेमी थक्क झाले. नक्की याला काय म्हणावं हेच कोणाला समजेनासं झालं होतं. काहींच्या मते काही तरी वेगळं करण्याचा हा फसलेला प्रयोग होता, तर काहींना फक्त हा प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप वाटला. कित्येकांनी काही तरी वेगळं म्हणून हे स्वीकारलंही, पण त्याच वेळी या फॅडवर कडाडून टीकाही झाली.
फॅशनचं जग भन्नाट असतंच, त्यात रोज काही तरी नवीन होत राहतं आणि त्या प्रवाहात आपण सतत अग्रेसर असावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. त्यामुळे सतत होणारे फॅशन शो, चित्रपट यांच्या माध्यमातून बदलत जाणारी फॅशन टिपण्यासाठी जगभरातील करोडो मुलांच्या नजरा सज्ज असतात. त्यामुळे एखाद्या सेलेब्रिटीने किंवा एखाद्या शोमध्ये दिसला जाणारा ट्रेंड ताबडतोब तरुणाईमध्ये पसरायला सुरुवात होते. असाच एक ट्रेंड मध्यंतरी इंटरनेटवर बराच गाजला, तो म्हणजे काखेतले केस रंगवणं.
मध्यंतरी तरुणांची लाडकी गायिका टेलर स्विफ्ट हिनेही हिरव्या रंगामध्ये काखेतले केस रंगविले होते, तर २०११ मध्ये पॉप सिंगर लेडी गागानेसुद्धा हिरव्या रंगातले अंडरआर्म्स एका कॉन्सर्टला मिरविले होते. या ट्रेंडला काहीशी ‘फेमिनिझम’ची छटा असल्याचाही एक मतप्रवाह आहे. रग्गड पैसा, वेळ खर्च करून केवळ मुलांच्या नजरेत भरण्यासाठी व्ॉिक्सग, थ्रेडिंगसारख्या ब्युटी थेरपीला नाकारण्यासाठी असा ट्रेंड येत असल्याचं एक मतप्रवाह सांगतो. काही वर्षांपूर्वी हॉलीवूड अभिनेत्री अॅन हॅथवेनेसुद्धा एका मोठय़ा कार्यक्रमात रेड कार्पेटवरून मिरवताना स्लिव्हलेस गाऊनवर काखेतले केस शेव्ह न करणं पसंत केलं होतं, तेव्हा तिथल्या माध्यमांनी तिच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अॅनने मात्र आपल्या कृतीचं समर्थनच केलं होतं.
एखाद्या फॅशन ट्रेंडबद्दल असे भिन्न मतप्रवाह तयार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरवर्षी कोणता तरी ट्रेंड अशा वादाच्या भोवऱ्यामध्ये नक्कीच अडकतोय. मागच्या वर्षी भुवया छाटणं किंवा ब्लीच करणं, त्याआधी जिभेपासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराच्या विविध भागांवर पिअर्सिग करून घेणं, टॅटूने अख्खं शरीर रंगवणं, वाजवीपेक्षा जास्त उंचीच्या हिल्स घालणं असे विविध ट्रेंड्स काळानुसार आले आणि गेलेही. वेळोवेळी त्यावर टीका झाली आणि प्रसिद्धीही मिळाली. त्यामुळे या ट्रेंड्सना नक्की फॅशनमध्ये समाविष्ट करायचं की नाही याबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह होतं.
विअर्ड फॅशनमागची मानसिकता
स्वत:ला इतरांपासून वेगळं सिद्ध करण्याची स्पर्धा प्रत्येक जण करीत असतो. त्यामध्ये फॅशनचं नाव आघाडीवर असतं. कारण आपला पेहराव हा आपल्याआधी लोकांसमोर आपल्याला सादर करीत असतो. त्यामुळे या पेहरावाच्या माध्यमातून लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो. त्यातून अशा ट्रेंड्सचा जन्म होतो. काळानुसार आपण जितके प्रगत होत जातो तितकेच आपल्या नकळतपणे इतिहासाकडे परतत असतो. टॅटू, पिअर्सिग अशा पद्धती प्राचीन आफ्रिकन संस्कृती या ट्रेंड्सचं जन्मस्थान आहे. सतत काही तरी वेगळं करण्याचा अट्टहास कित्येकदा समोरच्याला जगाच्या पाठीमागे नेऊन पोहोचवतो. असे ट्रेंड्स समाजाचं नेतृत्व नक्कीच करीत नाहीत, पण त्यांचं स्वरूपही मर्यादित असतं, असं मानसोपचारतज्ज्ञ राजेंद्र बर्वे सांगतात.
अर्थात त्यामुळे फक्त ‘कुल’ दिसण्यासाठी आपण किती थराला जायचं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असतो आणि त्यानंच ते विचारपूर्वक ठरवावं, हे नक्की.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2015 रोजी प्रकाशित
अतरंगी फॅशन
रोजच्या नियमानुसार इंटरनेटसमोर बसणाऱ्या जगभरातील तरुणाईला अमेरिकेतील काही मुलींनी अपलोड केलेल्या फोटोनं चकित केलं. त्यांनी चक्क काखेतले केस रंगवलेले होते. बरं, केस लपवायचे म्हणून स्किन टोन किंवा लाइट शेडमध्ये केस रंगवण्याऐवजी ब्राइट नियॉन रंगांचा वापर केला होता. त्यामध्ये फ्लोरोसंट हिरवा, …
First published on: 23-01-2015 at 01:16 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weird fashion trends