रंगीबेरंगी फुलपाखरं पाहून त्याकडे हरखून पाहणारी, आनंद घेणारी आपल्यापैकी अनेकजण असतील. पण, नुसतंच पाहात राहण्यापेक्षा त्यांचं अभ्यासात्मक निरीक्षण करत संशोधक दृष्टी घडवणारी आणि भविष्यात संशोधन क्षेत्रातच वाटचाल करणारी श्वेता सुतार ही खऱ्या अर्थाने फक्त फुलपाखरांची नव्हे निसर्गाचीही सखी आहे.

सप्टेंबर म्हणजे ‘बिग बटरफ्लाय मंथ’! या निमित्ताने आपण फुलपाखरांच्या विश्वात खऱ्या अर्थाने डोकावू शकतो. त्यांचा अभ्यास करणं शक्य नसलं तरी त्यांना हरखून पाहत राहण्याचा आनंदही अलौकिक अनुभवच असतो. औंधच्या श्वेता राजेंद्र सुतार या तरुणीने मात्र लहानपणापासूनच या फुलपाखरांशी जोडलेलं नातं जपलं, वाढवलं आहे.

लहानपणी जंगलात फिरताना रंगीबेरंगी फुलपाखरांच्या मागे धावत खेळणारी श्वेता सुतार, आज त्यांच्याच संवर्धनासाठी संशोधक या नात्याने झटते आहे. शिवाय, या फुलपाखरांबरोबरच निसर्गातील अशा अनेक नवलाईच्या गोष्टी जपाव्यात, लोकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी ती पर्यावरण शिक्षिका म्हणूनही कार्यरत आहे.

श्वेताचं बालपण औंधमध्येच गेलं. प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणी त्यांच्या पुढच्या आयुष्यावर अनेकदा प्रभाव टाकतात. श्वेताही त्याला अपवाद नव्हती. लहानपणी आजीबरोबर जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी म्हणून जावं लागायचं. काम करता करता फुलपाखरं आणि जंगलातली झाडंझुडपं, पक्षी-प्राणी हे सगळं सौंदर्य तिच्या मनात रुजत गेलं. आज तीच श्वेता जैवविविधता संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करते आहे.

झाडांमध्ये, जंगलांमध्ये खेळताना फुलपाखरं, पतंग आणि वनस्पती यांचं महत्त्व, वातावरण बदलानुसार त्यांच्यात होत जाणारे बदल या सगळ्याचा अनुभव तिने प्रत्यक्ष घेतला होता. लहानपणी सहज म्हणून अनुभवलेलं हे जंगलविश्व आता तिच्या कार्याचा भाग आहे. किंबहुना, या निसर्गाची जपणूक हेच तिचं ध्येय झालं आहे. शेतकरी कुटुंबातली असल्याने झाडांप्रतीचं प्रेम आणि त्यांची जपणूक केली पाहिजे, हे बाळकडू घरातूनच मिळालं होतं. पुढे शिक्षणातून निसर्गाप्रतीचं हे प्रेम अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने आकारत गेलं, असं ती सांगते.

श्वेताने वायसी कॉलेज, सातारा येथे सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी शिक्षण घेतले. आणि नंतर सूक्ष्मजीवशास्त्र व पर्यावरणशास्त्रातील दुहेरी पदव्युत्तर शिक्षण घेत मग तिने संशोधन क्षेत्रात पाऊल टाकले. महादरे अरण्याच्या जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करताना तिने फुलपाखरांचा अभ्यास निवडला. ‘महादरे इकोलॉजिकल रिसर्च इंटरडिसिप्लिनरी ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली श्वेताने फुलपाखरांच्या जीवनचक्रापासून ते त्यांच्या खाद्यावनस्पतींशी असलेल्या नात्यापर्यंत सखोल निरीक्षण आणि अभ्यास सुरू केला.

या टीमच्या प्रयत्नातून २०२३ मध्ये महादरे अरण्याला ‘महादरे संवर्धन राखीव’ असा दर्जा मिळाला आणि महादरे गावाला ‘फुलपाखरांचे गाव’ ही नवी ओळखही मिळाली. त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत श्वेताने महादरे अरण्यातलं हे संशोधन ‘बटरफ्लाय डायव्हर्सिटी इन महादरे कॉन्झर्वेशन रिझर्व्ह, सातारा, वेस्टर्न घाट अ सनॉप्टिक चेकलिस्ट’ या संशोधन निबंधात उतरवलं. श्वेताच्या या संशोधन निबंधात महादरे अरण्यातील फुलपाखरांच्या ३४६ पैकी तब्बल १८४ प्रजातींची नोंद आहे.

‘महादरे इकोलॉजिकल रिसर्च इंटरडिसिप्लिनरी ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून श्वेता जैवविविधता सर्वेक्षण, जागृती कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना तसेच, गावकऱ्यांना फुलपाखरं व इतर कीटक ओळखण्याचे प्रशिक्षण देते. तिने कास समितीच्या ग्रामव्यवस्थापन आराखड्यातही अभ्यासपूर्ण योगदान दिले आहे, तसेच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव गणनेसह विविध उपक्रमांतही तिने सहभाग घेतला आहे. सध्या श्वेता आपल्या गावी औंध (जि. सातारा) येथील एस. एस. हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित विषय शिकवते. तसेच, फ्रीलान्स संशोधक म्हणून ‘महादरे इकोलॉजिकल रिसर्च इंटरडिसिप्लिनरी ऑर्गनायझेशन’बरोबरही श्वेता कार्यरत आहे.

संवर्धन म्हणजे केवळ प्रजातींचे रक्षण नव्हे, तर माणसांना निसर्गाशी जोडणे आणि त्यांना निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षक बनविण्याची प्रेरणा देणे हे अधिक महत्त्वाचे आहे, यावर आपला ठाम विश्वास असल्याचं ती सांगते. भविष्यात संशोधनाचं हे व्यासपीठ अधिक विस्तारण्याची आणि त्या माध्यमातून पर्यावरण शिक्षणाला अधिक बळ देण्याची तिची इच्छा आहे. केवळा सामाजिक कार्य म्हणून पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सक्रिय राहायचे नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही तिला या क्षेत्रात भरीव काम करायचं आहे. पर्यावरणाचं भान, आपण करत असलेल्या अभ्यास – संशोधानचं महत्त्व तरुण वयातच ओळखणं आणि त्यासाठी सतत स्वत:ला कार्यरत ठेवणारी, समाजोपयोगी कार्य कसं करता येईल या दृष्टीने शोध घेत राहणारी श्वेतासारखी संशोधक तशी दुर्मीळच आणि म्हणूनच तिचं कार्य अधिक मोलाचं ठरतं.

viva@expressindia.com