मुंबईच्या सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या सोहळय़ांचा साक्षीदार असलेल्या षण्मुखानंद सभागृहाच्या स्थापनेस ६० वर्षे पूर्ण होत आहेत. सभागृहाची ही षष्ठय़ब्दीपूर्ती साजरी करण्यासाठी वयाची साठी ओलांडलेल्या ६०० जोडप्यांच्या सामूहिक षष्टय़ब्दीपूर्तीचा अनुपम सोहळा शनिवारी रंगणार आहे.
‘श्री षण्मुखानंद कला आणि संगीत सभे’ला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहा’त साठी ओलांडलेल्या ६०० जोडप्यांचा म्हणजेच १२०० जणांचा षष्टय़ब्दीपूर्ती सोहळा (ज्येष्ठ सदस्य षठय़ब्दीपूर्ती समारोह) साजरा करण्याचा वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम होणार आहे. शनिवार, २ फेब्रुवारी रोजी हा समारंभ होणार असून त्यातील सर्व विधी करण्यासाठी जवळपास १२० पुरोहित उपस्थित असतील. या ६०० जोडप्यांमधील काही जोडपी तर वयाच्या सत्तरीत-नव्वदीत       आहेत.
समारंभाच्या आरंभी सर्व जोडपी सामूदायिक संकल्प करतील. नंतर गणपती, आयुष्य, धन्वंतरी आणि महामृत्यूंजय जप आदी होमहवन करण्यात येतील.
यावेळी प्रथेप्रमाणे आप्तस्वकीय, मुला-नातवंडांच्या उपस्थितीत ६०० जोडप्यांचे लग्न पुन्हा एकदा लावण्यात येईल. मंगळसूत्र घालण्याचा विधी संपल्यावर चारही वेदांमधील मंत्रांचे पारायण करण्यात येईल.
 या समारंभात पुरुष मंडळी धोतर तर स्त्रिया साडी परिधान करतील. यावेळी ‘श्री षण्मुखानंद कला आणि संगीत सभे’मार्फत ‘ग्रँडमाज मेडिकल प्रीस्क्रिप्शन’ (आजीबाईंचा बटवा) आणि ‘ग्रेसफुल एजिंग’ ही स्वामी तेजोमयानंदांची पुस्तके प्रकाशित करण्यात येणार          आहेत.
सर्व ६०० जोडप्यांना या दोन्ही पुस्तकांच्या प्रती मोफत देण्यात येतील. तसेच त्यांना व्यायामशाळेचा लाभही दिवसभरात कधीही घेता              येईल.
६०० जोडप्यांच्या या सामूहिक विवाहाबरोबरच ६० केक कापण्याचा सोहळा हाही या समारंभाचे आकर्षण असणार आहे. सभासदांची मुले सभागृहाची ६० वर्षे साजरी करण्यासाठी व्यासपीठावर ६० केक कापतील. ‘ज्येष्ठांची काळजी’ यावर एक नाटिकाही यावेळी सादर  होईल.