तालुक्यात भीषण दुष्काळामुळे शेतकरी व जनावरांची दैना झाली आहे. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असताना छावणीत दाखल केलेल्या जनावरांची नोद घेतली जात नाही, तक्रार करूनही अधिकारी टाळाटाळ करतात अशी कैफियत कर्जत तालुक्यातील शिष्टमंडळाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडली. जनावरांचे अनुदान वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली.
या शिष्टमंडळात तालुक्यातील युवक नेते राजेंद्र देशमुख, जिल्हा परीषद सदस्य परमवीर पांडूळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपसभापती किरण पाटील आदींचा समावेश होता.  
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता सर्वात जास्त आहे. सर्व उद्भव कोरडे पडले आहेत. खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम सलग दुसऱ्या वर्षी वाया गेल्याने शेतकरी व पशुधन अडचणीत आले आहे. तालुक्यात अनेक छावण्या सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र महसूल विभागाचे अधिकारी सतत काही तरी नियम दाखवून अडवणूक करीत आहेत. छावणीत नवीन जनांवराचे नोंदणी करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे प्रसंगी शेतकऱ्यांवर जनावरे परत नेण्याची वेळ येते. चाऱ्याचे अनुदान वाढवून देण्याचीही मागणी या शिष्टमंडळाने केली. त्यानुसार नंतर निर्णय झाल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.