सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनासह नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम गोयल यांनी येथे केले.
नवीन व जुन्या पालिका कार्यालयाजवळील राष्ट्रीय सफाई मजदूर संघाच्या शाखांचा उद्घाटन सोहळा गोयल यांच्या हस्ते झाला. विदर्भ मजूदर संघाचे अध्यक्ष मोतीचंद्र कंडेरा, सावित्रीबाई घोगे, मनमाडचे नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, मुख्याधिकारी संजय केदारे, शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवक या कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष संजय बहोत, शहराध्यक्ष सतीश बहोत यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर सूत्रसंचालन सुनील नायर यांनी केले.
पालिकेतील सफाई मजदूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी आता संघटनात्मक कार्यात लक्ष घालून जोमाने कार्य करावे. त्यांना सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष पगारे यांनी दिले. मुख्याधिकारी केदार यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी, समस्या व मागण्या समजावून घेऊन त्यावर सामंजस्याने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
सफाई कामगारांना आंबेडकर आवास योजनेंतर्गत घरकुल द्यावे, लोकसंख्येच्या आधारावर नवीन कामगारांची तातडीने भरती करावी, सफाई कामगारांना लागणारे आवश्यक ते सर्व प्रकारचे साहित्य तातडीने द्यावे, सफाई कामगारांच्या मुलांना रोजगारासाठी पालिकेचे १० टक्के गाळे आरक्षित ठेवावेत, सफाई कामगारांच्या पाल्यांना पदोन्नती देण्यात यावी, सफाई कामगारांचा वैद्यकीय भत्ता बंद करून त्याऐवजी मेडिकल क्लेम देण्यात यावा आदी मागण्या या वेळी जिल्हाध्यक्ष संजय बहोत व शहराध्यक्ष सतीश बहोत यांनी केल्या. या वेळी संघाच्या फलकाचे अनावरण झाले.