तारदाळ निमशिरगाव रोडवरील सदाशिव बंडू जाधव यांच्या घरावर चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. या घटनेत चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले. दरोडय़ानंतर चोरटय़ांना जमावाने पकडण्याचा प्रयत्न केला. पण कोयत्याचा धाक दाखवत ते तेथून पसार झाले. पोलीस उपअधीक्षक दिलीप कदम यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली तसेच तपासासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ निमशिरगाव मार्गावरील जाधव मळय़ात सदाशिव बंडू जाधव यांचे शेतघर आहे. सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास बुरखाधारी अज्ञात चोरटय़ांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बाहेरच्या खोलीत झोपलेल्या संजय कातळेकर आणि बाळू छत्रे या दोघांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरड ऐकून आतील खोलीत झोपलेले जाधव दाम्पत्य बाहेर आले असता सदाशिव जाधव यांनाही मारहाणीचा प्रयत्न झाला. या वेळी जाधव यांच्या गळय़ाला कोयता लावून चोरटय़ांनी तिजोरीच्या किल्लीची मागणी केली, तसेच जाधव यांच्या पत्नीस सोन्याचे मंगळसूत्र आणि कर्णफुले काढून द्या अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने दागिने काढून दिले. घरातील गोंधळामुळे शेजारील बाळू जाधव आले असता त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी नागरिक जमू लागल्याने चोरटे पलायन करू लागले. चोरटय़ांचा जाधव कुटुंबीयांनी पाठलाग केला असता एका चोरटय़ास पकडले. परंतु अन्य दोन साथीदारांनी कोयत्याचा धाक दाखवत ते तेथून पसार झाले. याबाबत हातकणंगले पोलिसांना माहिती कळताच घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. तसेच श्वानपथकासही पाचारण केले होते. श्वानपथकाने सांगली-शिरोली मार्गावरील मर्दा सूतगिरणीपर्यंत माग काढून ते तिथेच घुटमळले. पोलीस उपअधीक्षक दिलीप कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्याचा प्रकार तारदाळ परिसरात प्रथमच घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
कोल्हापूरजवळ सशस्त्र दरोडा; मारहाणीत दोघे जखमी
तारदाळ निमशिरगाव रोडवरील सदाशिव बंडू जाधव यांच्या घरावर चोरटय़ांनी सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. या घटनेत चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले. दरोडय़ानंतर चोरटय़ांना जमावाने पकडण्याचा प्रयत्न केला.

First published on: 05-02-2014 at 03:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armed robbery near kolhapur two injured