सलग तीन ते चार महिन्यांपासून शांत वाटणाऱ्या नाशिक शहरातील वातावरणास बुधवारी मध्यरात्री पंचवटीतील ओंकारनगर भागात झालेल्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटनेमुळे छेद गेला. अज्ञात संशयितांनी एका इमारतीत तीन दुचाकीसह तितक्याच सायकलही पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत सिडको परिसरात होणाऱ्या या घटना आता शहरातील इतर भागातही घडू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी इमारतीच्या पार्किंगमधील १२ ते १५ वाहनांच्या टाक्यांमधून पेट्रोलही लंपास करण्यात आले. याच पेट्रोलचा वापर करून दुचाकी पेटवून दिल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
शहरात वाहनांची जाळपोळ करण्याचे प्रकार नवे नाहीत. त्याची सुरूवात काही वर्षांपूर्वी सिडको परिसरातून झाली होती. पोलीस यंत्रणेला धडा शिकविण्यासाठी सिडको परिसरात ३५ ते ४० वाहने पेटवून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर टवाळखोरांकडून वाहनांच्या जाळपोळीचे एकच सत्र सुरू झाले. प्रत्येकवेळी केवळ ठिकाणे बदलली. रात्रीच्यावेळी सर्वसामान्य नागरिकांची वाहने पेटवून दहशत निर्माण करण्याच्या प्रकारांनी अवघे शहर असुरक्षिततेच्या गर्तेत लोटले गेले होते. कुलवंतकुमार सरंगल यांनी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू झाले. झोपडपट्टी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन, वाहनांची तपासणी, गुन्हेगारांवर कारवाई या सत्रामुळे नाशिकच्या वातावरणात झपाटय़ाने बदल झाले.
पोलीस यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेची अनुभूती येत असताना काही असंतुष्ट घटकांनी पुन्हा पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोडवर ओंकारनगर येथे वाहनांची जाळपोळ करण्याचा प्रकार हा त्याचाच एक भाग.
‘तारांगण ब’ या इमारतीतील पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या दुचाकी व सायकल्स संशयितांनी पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. रात्रीच्या सुमारास काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे लक्षात आल्यावर चांगाळकर यांनी घरातील गॅस सिलिंडरची पाहणी केली. त्याचवेळी इमारतीच्या पार्किंगमध्ये काही वाहने जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता इमारतीतील रहिवाशांना जागे केले आणि खाली धाव घेतली. सर्वानी घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असली तरी तोपर्यंत तीन दुचाकी व तीन सायकल्स जळून खाक झाल्या. मंगेश सोनवणे, अशोक पवार व लक्ष्मण चांगाळकर यांच्या दुचाकी व सायकल्सचा त्यात समावेश आहे.
दरम्यानच्या काळात पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. संशयितांनी दुचाकी पेटविण्याआधी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इतर १२ ते १५ वाहनांचे ‘लॉक’ तोडून पेट्रोल चोरले. वाहने जाळण्यासाठी या पेट्रोलचा वापर झाला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे सोनवणे यांनी ‘नाशिक वृत्तान्त’शी बोलताना नमूद केले.
इमारतीतील रहिवाशांचा कोणाशी कोणतेही वाद झालेले नाहीत. असे असताना वाहनांची जाळपोळ झाल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. यापूर्वी याच इमारतीत वाहनांमधील पेट्रोल चोरीस जाण्याचे प्रकार अधुनमधून घडत होते.
हे चोरटेही कधी नागरिकांच्या हाती लागले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.