वाळू वाहतूकदारांवर पोलिसांकडून होत असलेल्या कथीत अन्यायाच्या विरोधात महसूल, पोलीस तसेच वाळू वाहतूकदार संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी वाळू वाहतूकदारांच्या संघटनेला आज दिले.
संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र शेवाळे तसेच शंतनू पांडव, राजेंद्र पठारे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याकडे निवेदन दिले. नियमानुसार वाळू वाहतूक करत असूनही पोलिसांकडून पिळवणूक होते अशी तक्रार त्यांनी केली. चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांना संघटना पाठीशी घालत नसल्याने त्यांच्याकडूनही त्रास दिला जातो, त्यामुळे संघटनेच्या सदस्यांना वाळू वाहतूक करताना पोलीस संरक्षण द्यावे तसेच अडवणूक करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
धोंडीभाऊ निकड्र, गजानन होळकर, सुनिल कोतकर, विकी खरात, युवराज पवार, कृष्णा लांडे, अजय पवार, साजिद खान, अशोक ढगे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. संघटनेने आतापर्यंत चोरटी वाहतूक करणाऱ्या किती वाळू वाहतूकदारांना पकडून दिले त्याची माहिती घेतली. एप्रिलमध्ये सर्व संबधितांची संयुक्त बैठक आयोजित करू असे आश्वासन त्यांनी दिले.