आत्मकथन लिहिणे हे वाटते तितके सोपे नाही. आत्मचरित्र लिहिणे म्हणजे स्वत:ला सोलून काढण्यासारखे आहे, असे प्रतिपादन हिरा दया पवार यांनी बुधवारी दादर येथे केले. नेहा सावंत यांनी शब्दांकन केलेल्या आणि डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या हिरा पवार यांच्या ‘सांगायची गोष्ट म्हणजे’ या आत्मचरित्राचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी हिरा पवार बोलत होत्या. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत व लेखक रावसाहेब कसबे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळ्ये, लेखिका ऊर्मिला पवार,  आदी उपस्थित होते. आजवरच्या आयुष्यात सुगंधी क्षणांबरोबरच काटेही आले. आयुष्याच्या गाठोडय़ातील हे क्षण उलगडण्यासाठी आत्मकथनाच्या माध्यमातून मी हे गाठोडे सोडायचे ठरवले आणि त्यातून या पुस्तकाचे लेखन झाले असल्याचेही हिरा पवार म्हणाल्या.