दिल्लीत तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी िपपरी पालिका सभेत उमटले. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत त्या घटनेच्या निषेधार्थ सभा तहकूब केल्याची घोषणा महापौरांनी केली. चित्रपटात दाखवण्यात येणारी अश्लील दृश्ये व पोस्टरवरील बीभत्स छायाचित्रे यामुळेच अशा घटना वारंवार घडतात, असे सांगून यावर सेंन्सॉर बोर्डाचे नियम कडक करावेत व तशा चित्रपटांना बंदी घालण्याची मागणी चंद्रकांता सोनकांबळे यांनी केली.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत पक्षनेत्या मंगला कदम यांनी तहकुबाची सूचना मांडली, त्यास मंदाकिनी ठाकरे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतरच्या चर्चेत सुलभा उबाळे, सीमा सावळे, चंद्रकांता सोनकांबळे, अश्विनी मराठे, भारती फरांदे, सुजाता पालांडे, प्रतिभा भालेराव, अनिता तापकीर, विनया तापकीर, वैशाली काळभोर, झामाबाई बारणे, नीता पाडाळे, आशा शेंडगे, गीता मंचरकर, स्वाती कलाटे, माया बारणे, शमीम पठाण, विमल काळे, आशा सूर्यवंशी यांच्यासह धनंजय आल्हाट, अतुल शितोळे, तानाजी खाडे, भाऊसाहेब भोईर, कैलास कदम, आर. एस. कुमार, सुरेश म्हेत्रे, बाबा धुमाळ, विलास नांदगुडे, राहुल जाधव, अनंत कोऱ्हाळे, योगेश बहल, उल्हास शेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याबाबत एक संयुक्त निवेदन तयार करून तशी मागणी सरकारकडे करण्याची ग्वाही महापौरांनी दिली. शाळा-महाविद्यालयांसमोरील रोडरोमिओंचा उच्छाद रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी प्राचार्याना पत्र देतानाच पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेण्याची सूचना भोईर यांनी केली. महिलांना बंदुकीचा परवाना द्या, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली, तर कुमार यांनी बलात्कार करणाऱ्यांचे एन्काऊंटर केले पाहिजे, असे मत मांडले.