जिल्ह्य़ात टंचाई संदर्भातील उपाययोजना करताना तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्याच्या तीव्रतेचा फटका अधिक जाणवत असल्याचा ठपका आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने ठेवला. दरम्यान टंचाईचा आढावा घेण्यासाठी जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पुढील आठवडय़ापासुन दौरा करुन तालुकानिहाय बैठका घेणार आहेत.
जि. प. स्थायी समितीची सभा आज लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर लंघे यांनी ही माहिती दिली. आगामी काळात दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्याने अधिकाऱ्यांनी सकारात्मक व समन्वयाने काम करावे, अशी सुचना सभेत लंघे यांनी दिली. निर्णय जिल्हाधिकारी, तहसीलदार घेतात, अंमलबजावणी करणारी यंत्रणा जि. प.ची आहे, त्यांच्यातील विसंवादामुळे टंचाईचे निराकरण करताना अडचणी येत आहेत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी समन्वय ठेवावा, अशी अपेक्षा सभेत व्यक्त करण्यात आली.
पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या खेपा प्रत्यक्षात खुपच कमी होत आहेत, सहा महिन्यांपुर्वीही ही तक्रार होती, त्यात सुधारणा झाली नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने टँकर वाढवावेत, रोजगार हमीच्या कामाचे वेतन वेळेत करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. गावात टँकर गेल्यावर खेप कोठे टाकायची याबद्दल सरपंच व ग्रामसेवक मनमानी करतात, त्यामुळेही नागरिकांना पाणी मिळत नाही, पाणी सर्वाना मिळण्याच्या दृष्टीने खेप करावी, अन्यथा ग्रामसेवकावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
तालुकानिहाय टंचाईच्या बैठका घेताना लंघे यांनी लोकप्रतिनिधींसह इतरही सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सुचना केली आहे. टंचाईसह जि. प.च्या इतरही कामाचा आढावा घेतला जाणार आहे.
सभेस उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती कैलास वाकचौरे, पर. शाहुराव घुटे सदस्य सुजित झावरे, बाळासाहेब हराळ तसेच अधिकारी उपस्थित होते.     
* सभेतील निर्णय
* निधी खर्चाच्या आढाव्यात आरोग्य विभाग पिछाडीवर
* २६२ प्राथमिक शिक्षकांचे समायोजन जुन्याच नियमानुसार, आरटीईनुसार नाही.
* लाभार्थीना ऑईल इंजिनचा उपयोग होत नसल्याने कृषि विभागाचा निधी वीजपंप व जनरेटर घेण्याकडे वळवणार.