काँग्रेस आघाडी सरकारविरुद्धचा युवकांमधील असंतोष संघटित करण्यासाठी ‘एल्गार आघाडी सरकारविरुद्ध ही मोहीम भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सुरू केली जाणार आहे, त्यासाठी आपण राज्याच्या प्रत्येक जिल्हय़ात दौरा करणार असल्याची माहिती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी आज पत्रकारांना दिली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘युवा निर्धार मेळाव्या’साठी पालवे-मुंडे येथे आल्या होत्या. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच नगरमध्ये आल्या होत्या. पद स्वीकारल्यानंतर त्यांनी भाजयुमोच्या वतीने‘एल्गार आघाडी सरकारविरुद्धचा’ हा पहिलाच कार्यक्रम जाहीर केला.
आगामी लोकसभा व त्यानंतर होणा-या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही मोहीम सुरू केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोहिमेची सुरुवात तुळजापूर येथून होईल, तर समारोप पुणे येथे क्रांतिदिनी, ९ ऑगस्टला पुण्यात युवकांचा मेळावा घेऊन केला जाणार आहे. मोहिमेत काँग्रेस आघाडी सरकारचा केंद्र व राज्यातील भ्रष्टाचार लोकांपुढे मांडला जाणार आहे, विविध सर्वेक्षणातून सध्या भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप कोणताही ढिलेपणा करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजप लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करत आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव पुढे करणार या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप आम्ही उमेदवार ठरवला नाही, असे उत्तर देतानाच त्यांनी, मात्र लोकांचा प्रतिसाद पाहता राज्यात भाजपच प्रथम क्रमांकाचा पक्ष राहील, असा दावा केला. कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधीसाठी निवडणुका व्हायलाच हव्यात, मात्र त्या राजकीय हस्तक्षेप टाळून व्हायला हव्यात, त्यातून नवे नेतृत्व निर्माण होण्यास मदतच होणार आहे. राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी लिंगडोह समितीच्या शिफारशी स्वीकारायला हव्यात, यासाठी आपण सरकारकडे मागणी करू, असे त्या म्हणाल्या. बारा रुपयांत जेवण मिळते, असे वक्तव्य करून काँग्रेस नेते गरीब नागरिक व त्यांच्या गरिबीची क्रूर थट्टाच करत असल्याची टीका त्यांनी केली.