इचलकरंजी नगरपालिकेच्या कामकाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसशी निर्माण झालेल्या विसंवादाबाबत काँग्रेसचे पक्षप्रतोद व ज्येष्ठ नगरसेवक त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांच्या राजीनाम्याबाबत आठ दिवसांत शहर काँग्रेस समितीच्या सुकाणू समितीची बठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत उपनगराध्यक्ष संजय कांबळे हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहतील, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
इचलकरंजी नगरपालिकेमध्ये या आठवडाभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये टक्केवारीच्या विषयावरून वादंग माजले होते. त्यावरून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत वेगळा विचार करण्याची शक्यताही बोलावून दाखवली होती. तर वेगवेगळय़ा कारणांमुळे दबाव येत राहिल्याने नगराध्यक्ष गोंदकर यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक आरगे यांच्याकडे राजीनामा दिला होता. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर रविवारी सकाळी काँग्रेस भवनामध्ये काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बठक झाली. बठकीस ३० नगरसेवकांपकी २६जण उपस्थित होते. प्रकाश आवाडे, अशोक आरगे यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. अनेक नगरसेवकांनी पालिकेत सुरू असलेल्या कामकाजावर स्पष्ट शब्दामध्ये भूमिका मांडून त्वरित समन्वय घडविण्याची गरज व्यक्त केली. बठकीस शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे, प्रकाश सातपुते, अहमद मुजावर, माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे आदी उपस्थित होते.
बठकीनंतर प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्यपदी प्रमोद पाटील यांच्या निवडीबद्दल बठकीमध्ये नगरसेवकांनी तक्रार केली. नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थानचा कबनूर येथे असलेला ३.३७ एकर इतका भूखंड प्रमोद पाटील यांनी गरप्रकारे परस्पर विकण्याचा प्रकार केला आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी तक्रार करू नये अशी सूचना काँग्रेस पक्षाकडे केली होती. मात्र काँग्रेस पक्षाची प्रमोद पाटील यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास पराभूत करून ते निवडून आले आहेत.
दरम्यान, सुप्रिया गोंदकर यांना नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी अद्याप याबाबत काही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत नेमका कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. आजच्या बठकीस संजय तेलनाडे, चंद्रकांत शेळके, श्रीरंग खवरे, मीना बेडगे हे नगरसेवक अनुपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2013 रोजी प्रकाशित
नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांच्या राजीनाम्याबाबत आठ दिवसांत निर्णय
इचलकरंजी नगरपालिकेच्या कामकाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसशी निर्माण झालेल्या विसंवादाबाबत काँग्रेसचे पक्षप्रतोद व ज्येष्ठ नगरसेवक त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
First published on: 05-08-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision in 8 days on resignation of mayor supriya gondkar