पाथर्डी तालुक्यातील शेकटे गावात कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले असले तरी या प्रकरणातील अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यास चालढकल होत असल्याने या गंभीर प्रकरणात पोलिसांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे सदस्य श्याम आसावा यांनी केली आहे. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी तालुक्यातील शेकटे येथे पायल कलाकेंद्रावर काल रात्री छापा टाकून पोलिसांनी तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या आठ महिलांना ताब्यात घेतले. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. संबंधित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचे न्यायालयाचे आदेश असूनही पोलिसांनी अद्याप याबाबत काहीही हालचाल केलेली नाही. या कलाकेंद्राचे छायाचित्रण झाले असून आरोपींनी पोलिसांबद्दलही माहिती दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी आसावा यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना त्यांनी तसे निवेदन दिले आहे.