नगरमध्ये छेडछाड विरोधी पथक कार्यरत
सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक राजेकुंभार यांच्या नेतृत्वाखाली शहरात छेडछाड विरोधी पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे छेडछाडीच्या घटनांना व रोडरोमिओंना चाप बसणार आहे.
दिल्ली येथे झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर नगरमध्ये विविध सामाजिक संघटना, संस्था व महिलांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. शहर बससेवेतही महिला व मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी आहेत. या रोडरोमिओंना अंकुश बसावा यासाठी पोलिसांनी स्वतंत्र छेडछाड विरोधी पथक सक्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक राजेकुंभार या पथकाच्या प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. शहर वाहतूक शाखा व अन्य चार कर्मचारी या पथकात असतील. शहरासह विविध शाळा, महाविद्यालयीन परिसर व उपनगरांतील काही ठिकाणी हे पथक अचानक भेट देऊन संबंधितांवर कारवाई करणार आहेत. शहरातील महिला छेडछाडीच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर अशा प्रकारचे एखादे पथक सक्रीय करण्याची मागणी नुकतीच शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. त्याची दखल घेत हे पथक सुरू होणार असल्याने शाळा व महाविद्यालयीन मुलींना त्रास देणारे रोडरोमिओ, तसेच महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना चाप बसणार आहे.
शहरातील प्रमुख शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओंच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. काही संस्थांचे चालक वारंवार तक्रारी करून कंटाळले, मात्र या गुंडांचा बंदोबस्त होऊ शकला नव्हता. विशेषत: न्यू आर्टस कॉलेज, पेमराज सारडा कॉलेज अशा संस्थांमुळे दिल्ली दरवाजा ते लाल टाकी या परिसरात या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. मुलींच्या छेडछाडीतून या टोळ्यांमध्येही बऱ्याचवेळा परस्परात मारामाऱ्या होतात, त्याचीही परिसरात दहशत आहे. या सर्व गोष्टींना यानिमित्ताने आता आळा बसू शकेल.  
दिल्लीत तरुणीवर झालेल्या भीषण अत्याचाराचे पडसाद नगरमध्येही उमटले असून त्याविरोधात शहरातील विविध राजकीय, तसेच स्वयंसेवी संघटना, महाविद्यालये, महिला संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे, निदर्शने करून या घटनेचा निषेध केला आहे. शिवसेना महिला आघाडी, तसेच स्नेहालय, चाईल्ड लाईन, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन अशा स्वयंसेवी संघटनांनी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी विविध उपाययोजना करतानाच अशा घटना रोखण्यासाठी कडक कायदे करावेत, अशी मागणी केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राळेगणसिद्धी येथे दिल्लीच्या घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च काढून आरोपींच्या फाशीची मागणी केली.