शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या सानेगुरुजी कथामाला बालभवनतर्फे घेण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रातील विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते झाले.
उत्कृष्ट बाल वाचक, वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला या स्पर्धामध्ये यश मिळविणाऱ्यांना बालदर्शिका, प्रशस्तिपत्रक, पुस्तके व उपयुक्त शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट बाल वाचकाचा पुरस्कार हा नियमित व विविध अंगाने वाचन करणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शशिकला खाडिलकर यांच्या देणगीतून रोख रक्कम स्वरूपात देण्यात आला. या वेळी झळके यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:तील ऊर्जा कायम वाढवीत राहण्याचे आवाहन केले. मुलांनी आई-वडिलांचा नेहमीच आदर करावा. आई-वडिलांनी मुलांवर ठराविक क्षेत्रात भवितव्य घडविण्याची सक्ती करू नये. संकटे ही परीक्षा पाहणारी असतात. त्यांचा न डगमगता सामना करावयाचा असतो. सुटीच्या कालावधीत विनोदी साहित्य, गोष्टींचे वाचन केल्यास मानसिक तणाव दूर होईल, असा उपदेशही त्यांनी केला.
वाचनालयाने बालभवनच्या विद्यार्थ्यांकडून कार्यक्रमाचे संयोजन केले. रागेक्षी वैरागकरने साने गुरुजी व कुसुमाग्रज यांच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रसंचालन मुग्धा जोशी हिने केले. अनुष्का देवचके हिने यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. ऋचा गायधनीने आभार मानले. अथांग कुलकर्णीने विद्यार्थ्यांच्या वतीने उत्कृष्ट वाचक म्हणून मनोगत व्यक्त केले.