शेतजमिनीचा सात-बारा उतारा उताऱ्यावरील इतर हक्कांची नावे कमी करण्यासाठी अडीच हजारांची लाच घेताना मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले.
मंगळवेढा येथे मंडळ अधिकारी हिरालाल सुतार हा आपला हस्तक गणपत लेंडवे याच्यामार्फत लाच घेताना सापडला. गोणेवाडी येथील शेतकरी विष्णू दगडू मासाळ यांच्या वडिलांच्या मालकीची असलेली शेतजमीन दोघा भावांच्या नावाने करण्यासाठी व इतर हक्कातील आत्यांची नावे कमी करण्यासाठी मासाळ यांनी तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार तहसीलदारांना आदेशही दिले होते. त्याप्रमाणे दोघा मासाळ बंधूंची नावे सदर शेतजमिनीच्या मालकी हक्कावर लागली. परंतु आत्यांची नावे कमी झाली नव्हती. त्यासाठी मासाळ यांनी दाखल केलेल्या अर्जाची कार्यवाही तहसीलदारांनी मंडल अधिकारी हिरालाल सुतार यांच्याकडे सोपविली. मासाळ यांनी सुतार यांची भेट घेतली असता त्यांनी या कामासाठी अडीच हजारांची लाच मागितली. तेव्हा मासाळ यांनी यासंदर्भात सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला होता.