दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या सोलापूरच्या राघवेंद्र रामदासी-कुलकर्णी याने मेंदूरोगतज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. याच स्वप्नाच्या वाटेवर अथक परिश्रम करून त्याने वैद्यकीय शिक्षण घेत मेंदूरोगतज्ज्ञ होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात कृतीत उतरविले. मुंबईच्या केईएम येथून त्याने न्यूरोसर्जरीची एमसीएच ही सर्वोच्च वैद्यकीय पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला.
दहावीबरोबरच बारावीच्या परीक्षेतही राघवेंद्र रामदासी हा गुणवत्तायादीत झळकला होता. उराशी बाळगलेले स्वप्न साकार करण्यासाठी त्याने सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळविली. नंतरचे एम. एस. (जनरल सर्जरी) हे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण त्याने नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेतले. अजूनही वैद्यकीय शिक्षणाची इच्छा व कष्टाची तयारी होतीच. त्यामुळे डॉ. राघवेंद्र रामदासी याने मुंबईच्या ‘केईएम’मधून न्यूरोसर्जरीसाठीची एम.सी. एच. ही सर्वोच्च पदवी मिळविली. या परीक्षेतही तो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात दुसऱ्या स्थानावर आला. न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात रुग्णांची सेवा करून संशोधनात्मक कार्य करण्याचा त्याचा मानस आहे. त्याचे वडील आर. एम. कुलकर्णी हे सोलापूरच्या वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालयातील सेवानिवृत्त समाजसेवक अधीक्षक आहेत. आई-वडिलांची व पत्नी डॉ. विशाखा रामदासी यांची साथ मिळाल्याने हे यश संपादन करता आले, असे डॉ. राघवेंद्र रामदासी यांनी नमूद केले.