शेती महामंडळाच्या आकारी पडीत जमिनी शेतक-यांना परत कराव्यात या मागणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक बोलावणार असल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली.
तावडे यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांची गोळीबाराच्या घटनेनंतर तब्बल १५ दिवसांनी भेट घेतली. त्या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बबन मुठे, पतित पावनचे सुनील मुथा, भाजपचे शहराध्यक्ष मारुती बिगले यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मुठे यांनी खंडकरी शेतक-यांना जमीन वाटप केली जात असून, आकारी पडीत जमीनमालकांनाही जमिनीचे वाटप करावे, भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याला पाणीपट्टी लागू करू नये, या पाण्यातून तलाव व गावतळे भरावे, प्रत्येक गावांना गावठाण द्यावे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
तावडे यांनी खंडक-यांचा प्रश्न भारतीय जनता पक्षाने लावून धरला, त्यामुळे आज शेतक-यांना जमिनी मिळत आहेत. आता आकारी जमीन मालकांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले. या वेळी राजेंद्र चव्हाण, संजय पांडे, डॉ. शांतिलाल पाटणी, गणेश राठी, शशिकांत कडुस्कर, अभिजित कुलकर्णी, गणेश शिंदे, जालिंदर मुठे आदी उपस्थित होते.