बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यातील सकारात्मक बाजूचा वेध घेत शिक्षण हक्क अभियान कोल्हापूर महापालिकेत यशस्वीपणे राबविले जाईल, असे प्रतिपादन सभेचे प्रभारी महापौर परिक्षीत पन्हाळकर यांनी केले.
केंद्र शासनाने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांकरवी केली जाणार आहे. शिक्षण हक्क अभियानांतर्गत या उपक्रमाची माहिती देण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची विशेष सभा शुक्रवारी आयोजित केली होती. महापौर व उपमहापौर यांनी राजीनामा दिला असल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य परिक्षीत पन्हाळकर यांची सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  यावेळी पुण्याहून आलेले शिक्षणविभागाचे अधिकारी श्री. पाटील यांनी या योजनेचा तपशील दिला. सर्व बालकांना शिक्षण मिळालेच पाहिजे, कोणी शालाबाह्य़ राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शालाबाह्य़ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याला मोफत शिक्षण कसे मिळेल त्या दृष्टीने महापालिकेने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना यापुढे असे वर्ग घेता येणार नाहीत, त्यांना दंडाला सामोरे जावे लागणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नगरसेवक राजू लाटकर, अदिल फरास, भूपाल शेटय़े यांनी महापालिकेचा शैक्षणिक दर्जा कशाप्रकारे खालावला आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. खासगी शाळांमध्ये ज्याप्रकारे शिक्षण दिले जाते तशी प्रभावी योजना महापालिकेच्या शाळेतही करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. उपायुक्त संजय हेरवाडे यांनी महापालिका प्रशासन सर्व शिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे सांगितले.