लहानपणी खूप मराठी चित्रपट पाहिले होते. मात्र नंतर काहीच संपर्क नव्हता. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा मनाचा ताबा घेतला. आता तर एका मराठी चित्रपटाचा सहनिर्माता म्हणूनच तुमच्यासमोर येत आहे. हिंदीप्रमाणेच माझे मराठीतील पदार्पणही दमदारच असेल, असा विश्वास रितेश देशमुख याने ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केला. रितेश सहनिर्माता असलेल्या आगामी ‘बालक-पालक’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने संवाद साधला.
या चित्रपटाची संहिता आणि कथा आपल्याला रवी जाधव याने आधीच ऐकवली होती. ‘बीपी’ आपल्यालाच निर्मित करायचा होता. मात्र त्या दरम्यान ‘हाऊसफुल २’ चे चित्रीकरण सुरू झाले आणि मग रवीशी आपला संपर्क नव्हता. नंतर रवीला विचारणा केली असता त्याने, आपण हा चित्रपट सुरू केल्याचे सांगितले. मात्र आपल्याला या चित्रपटाशी संबंधित राहायचे होते. त्यामुळे आपण सहनिर्मात्याच्या भूमिकेत आल्याचे रितेशने सांगितले.‘बीपी’चा विषय सगळ्याच देशांमध्ये खूप संवेदनशील आहे. मात्र हा चित्रपट मराठीत निघत असल्याने सर्वात आधी मराठी भाषिकांना तो आवडणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर ‘बीपी’ हिंदीतही प्रदर्शित करण्याचा विचार आहे, असे रितेशने सांगितले. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खास वेगवेगळ्या क्लृप्त्याही लढवल्याचे त्याने स्पष्ट केले. आम्ही पोस्टर स्पर्धा घेतली, त्याचबरोबर विविध महाविद्यालयांतील फेस्टिवल्सनाही हजेरी लावली. तसेच या विषयाला तरुणांनी याआधीच डोक्यावर घेतले असल्याने त्याची प्रसिद्धी झालीच आहे, असेही त्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entry will be powerful