चेन्नईस्थित उद्योगपती रमणी यांनी शिर्डीत बांधलेला साईआश्रम नाताळाची सुट्टी सुरू होण्यापूर्वी भक्तांसासाठी खुला करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही याबाबत संस्थाननेच निर्णय घेण्याचे आदेश दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
उद्योगपती रमणी यांच्या अधिपत्याखालील चेन्नई येथील श्री शिर्डी साई ट्रस्टने सुमारे १०० कोटी रूपयांची देणगी देऊन शिर्डी येथे साईभक्तांसाठी तब्बल १ हजार ५४० खोल्याची साईआश्रम धर्मशाळा बांधली आहे. मागच्या महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार होते, मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर राष्ट्रपती प्रणवकुमार मुखर्जी यांना एका लेखी पत्राद्वारे आपण दि. १७ डिसेंबरपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची विनंती केली होती, असे काळे यांनी सांगितले. त्यामागेही नाताळच्या सुट्टीतील साईभक्तांची गैरसोय टाळण्याचाच आपला हेतू होता. याचदरम्यान संदीप कुलकर्णी व राजेंद्र गोंदकर या दोन साईभक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. या आश्रमातील खोली भाडे ४०० रूपये (एसी) व २०० रूपये (नॉन एसी) असे आकारण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. या दोन्हीवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने शिर्डी संस्थानवर नेमण्यात आलेली समिती हे दोन्ही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, असे निर्देश दिल्याचे काळे यांनी या निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे. या समितीने हा निर्णय न घेतल्यास जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल, असेही खंडपीठाने म्हटले असल्याची माहिती काळे यांनी दिली.
नाताळाच्या सुट्टीत भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन साईआश्रमाच्या उद्घाटनाचा औपचारीक कार्यक्रम लगेचच घेणे शक्य नसेल तर साईभक्तांच्याच हस्ते हे उद्घाटन करून ही गैरसोय दूर करावी, अशी मागणी काळे यांनी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे केली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास येत्या दि. २०ला या इमारतीसमोर होमहवन करून त्याचे लोकार्पण करण्याचा इशाराही काळे यांनी दिला आहे.