शहरातील बेचाळीस रस्ते खासगी विकसकांकडून बांधून घेण्यासाठी पथ विभागाने केलेली निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरली असून या निविदा दहा ते पंधरा टक्के वाढीव दराने आल्याचेही स्पष्ट झाले आहे. अन्य सर्व निविदा वीस ते पंचवीस टक्के कमी दराने येत असताना या निविदा वाढीव दराने आल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या या निविदांना त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
शहराच्या उपनगरांमधील तसेच समाविष्ट गावांमधील बेचाळीस रस्ते महापालिका खासगी लोकसहभागातून (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप- पीपीपी) करून घेणार आहे. हे रस्ते बांधून देणाऱ्या विकसकांना बांधकाम विकास शुल्कात सूट दिली जाणार असून त्या मोबदल्यात विकसक हे रस्ते तयार करून देणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेला हरकत घेणारे पत्र नगरसेवक आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी सोमवारी आयुक्तांना दिले.
हे काम सुमारे एक हजार कोटी रुपयांचे असून एवढय़ा मोठय़ा रकमेच्या प्रकल्पासाठी निविदा काढताना मुख्य सभेची मान्यता घेण्यात आलेली नाही, असे बालगुडे यांनी या पत्रात म्हटले आहे. या निविदा खुल्या केल्यानंतर त्या दहा ते पंधरा टक्के वाढीव दराने आल्याचे उघड झाले आहे. सध्या सर्व कामांच्या निविदा अंदाजित रकमेपेक्षा वीस ते पंचवीस टक्के कमी दराने येत असताना ही निविदा वाढीव दराने आली असून ती मंजूर करणे म्हणजे महापालिकेचे आर्थिक नुकसान आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. रस्त्यांची ही कामे अंदाजपत्रकातील प्रचलित तरतुदीनुसार व पद्धतीनुसार करावीत, अशीही मागणी बालगुडे यांनी केली आहे. या निविदा तातडीने रद्द कराव्यात आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान थांबवावे, अशीही मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.