शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्कवर येणाऱ्यांनी सरकारी वाहनांतून यावे, असे आवाहन शिवसेना नेत्यांकडून करण्यात आले. तसेच या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिवसेनेचीच सत्ता असलेल्या बेस्ट उपक्रमानेही सर्व आगारांमधून शिवाजी पार्कसाठी जादा बसगाडय़ा सोडण्याची घोषणा केली, पण शिवसैनिक बस आगारांकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे आगारांतून एकही जादा बसगाडी बाहेर पडली नाही. तसेच या दिवशी प्रवाशांची संख्याच घटल्याने बेस्टच्या महसुलावरही काही प्रमाणावर परिणाम झाला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यदर्शनाला जनसागर लोटण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसैनिकांनी खासगी वाहनांतून येऊ नये. शिवाजी पार्कवर येण्यासाठी सरकारी वाहनांचा वापर करावा, असे आवाहन शिवसेना नेत्यांकडून शनिवारी करण्यात आले. बेस्ट उपक्रमानेही तत्परता दाखवून तमाम शिवसैनिकांसाठी मुंबईतील ठिकठिकाणच्या आगारांमधून शिवाजी पार्कला जाण्यासाठी जादा बसगाडय़ा सोडण्याची घोषणा केली. बस आगारांमध्ये सकाळपासून शिवसैनिकांची रीघ लागेल असा अंदाज बेस्ट अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे शनिवारी रात्रीच बेस्ट उपक्रमाने रविवारसाठी चालक-वाहकांची फौज सज्ज केली. मात्र सकाळी फारसे शिवसैनिक आगारांकडे फिरकलेच नाहीत. यामुळे अधिकारीही बुचकळ्यात पडले. शिवसैनिक न आल्यामुळे चालक-वाहक मात्र निवांतपणे त्यांची वाट पाहात आगारात खोळंबले होते.शिवसैनिकांच्या सेवेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक रद्द केल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आणि असंख्य शिवसैनिकांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेने ‘मातोश्री’ आणि शिवाजी पार्कवर जाणे पसंत केले. परिणामी, बेस्टची आगारे ओस पडली आणि जादा बसगाडय़ा शिवसैनिकांच्या प्रतीक्षेत दिवसभर उभ्या होत्या.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे दर रविवारी इतर दिवसांच्या तुलनेत बेस्टच्या परिवहन विभागाच्या महसुलात घट होते. मात्र रविवार, १८ नोव्हेंबर रोजी बेस्टचा महसूल साधारण एक ते सव्वा कोटी रुपयांनी घटला. या दिवशी बेस्टची दैनंदिन बससेवा सुरू होती, मात्र प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे बेस्टच्या तिजोरीत १ कोटी ५८ लाख रुपये ५३ हजार ७६५ रुपये जमा झाले. यापूर्वीच्या रविवारी म्हणजे ४ आणि ११ नोव्हेंबर रोजी बेस्टला बसभाडय़ातून अनुक्रमे २ कोटी ८२ लाख, ५ हजार ०५३ रुपये व २ कोटी ७३ लाख १६ हजार ३५० रुपये महसूल मिळाला होता. इतर सुट्टीच्या दिवसाच्या तुलनेत १८ नोव्हेंबर रोजी बेस्टच्या महसुलावर एक ते सव्वा कोटी रुपयांनी परिणाम झाला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
शिवसैनिकांच्या प्रतीक्षेत जादा बसगाडय़ा आगारातच खोळंबल्या
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्कवर येणाऱ्यांनी सरकारी वाहनांतून यावे, असे आवाहन शिवसेना नेत्यांकडून करण्यात आले. तसेच या आवाहनाला प्रतिसाद देऊन शिवसेनेचीच सत्ता असलेल्या बेस्ट उपक्रमानेही सर्व आगारांमधून शिवाजी पार्कसाठी जादा बसगाडय़ा सोडण्याची घोषणा केली, पण शिवसैनिक बस आगारांकडे फिरकलेच नाहीत.

First published on: 20-11-2012 at 11:21 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extra buses keep wating in depo for shivsena members