हुमणी किडीने डोके वर काढल्याने शेतकरी त्रस्त झाला असताना वारणा साखर कारखान्याने शेतक-यांच्या प्रयोगातून हुमणी किडीवर नियंत्रण मिळविले आहे. यामुळे ऐन पावसाळय़ात शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. वारणा नदीकाठच्या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पावसाळा हंगामाच्या सुरुवातीस मोठय़ा प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
हुमणी किडीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या शेतक-यांना दिलासा मिळावा यासाठी या किडीच्या नियंत्रणासाठी वारणा कारखान्यामार्फत सातत्याने अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कृषी महाविद्यालये-कोल्हापूर, व्ही.एस.आय. पुणे येथील शास्त्रज्ञांनी हुमणी कीड नियंत्रणाविषयी शेतकरी चर्चासत्राचे आयोजन, कीटकनाशक वापराची माहिती गावागावांतून देणे, शेती सेंटरकडून प्रबोधन आदी उपक्रम राबविण्याबरोबर गावपातळीवर कारखाना सेंटर ऑफीसमध्ये अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.     
किणी येथील वारणा कारखान्याचे ऊसउत्पादक सभासद विजय दणाणे यांचे आडसाली लागण केलेल्या ऊसपीक क्षेत्रातही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने त्या शेतकऱ्याने कारखान्याकडून उपलब्ध झालेल्या ‘क्लोरोपायरिफॉस व सायपरमेथ्रीन’ या कीटकनाशकांची एकत्रित आळवणीचा प्रयोग केला. त्यानंतर काही वेळातच हुमणी किडीच्या अळय़ा बाहेर येण्यास सुरुवात होऊन संपूर्ण ऊस प्लॉटमध्ये हुमणी किडींचा खच साचल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी शेती अधिकारी दीपक पाटील, ऊस विकास अधिकारी संग्राम पाटील, विठ्ठल पाटील, वारणा बझारचे संचालक अनिल पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतक-यांनी भेट देऊन पाहणी केली.     
वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे व कार्यकारी संचालक व्ही. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून हुमणी किडीच्या नियंत्रणाची मोहीम वारणा कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील गावागावांतून राबविण्यात येत असून शेतक-यांच्या प्रयोगातून यशस्वी झालेल्या हुमणी नियंत्रणाच्या या तंत्रज्ञानाची अधिक माहिती इतर शेतक-यांनाही देण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबविला आहे. गावपातळीवर तात्काळ वरील कीटकनाशकेही अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व मुख्य शेती अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.