बांबूची फुलदाणी, त्यात बांबूचीच विविध आकार आणि प्रकाराची रंगीबेरंगी फुले, बांबूच्याच खुच्र्या.. तांब्याच्या भांडय़ांची लकाकी कायम राहावी म्हणून नव्या तंत्रज्ञानाने लेपन केलेली चकचकीत भांडी, बस्तर आणि आदिवासी वारली शैलीतील चित्र-शिल्पकृती.. झोंबरा गारवा आणि हुडर्य़ाचे गरमागरम थालीपीठ, मांडे किंवा अस्सल कोकणी कोंबडीवडे.. असा माहोल वांद्रे पश्चिमेला रेक्लमेशन ग्राऊंडवरील महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये रंगतो आहे..
बांबू आणि मातीच्या विविध कलाकृतींनी यंदाच्या सरस प्रदर्शनात अनेकांची मनेजिंकली आहेत. गेली दोन वर्षे बाबूंच्या कलाकृतींचे नानाविध प्रकार रसिकांना पाहायला मिळाले. त्यावर यंदाच्या प्रदर्शनात सहभागी बचत गटांनी चार चाँद लावले आहेत. बांबूच्या मोहक कलाकृतींना प्रदर्शनात चांगली मागणी आहे. या कलाकृती अगदी १० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
घर सजावटीच्या मोठय़ा वस्तू आणि शिल्पकृती यांच्या स्टॉल्सवरही गर्दी पाहायला मिळते. इथे तीनचार हजारांपासून सुरुवात होते. या प्रदर्शनातील शिसवी देव्हाऱ्याने अनेकांच्या मनात घर केले आहे. देवघरात तांब्याचे ताम्हन, पळी पंचपात्र आणि दिवा असावा, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र तांब्याचे भांडे वातावरणातील ऑक्सिडेशनमुळे लगेचच काळे पडते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, काळ्या न पडणाऱ्या तांब्याच्या वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. त्यावरील रासायनिक थरामुळे त्याची लकाकी कायम राहते. फक्त धूळ पुसण्याचेच कष्ट घ्यावे लागतात.
हातमागावर विणलेल्या साडय़ा हे महिलांसाठीचे मोठे आकर्षण आहे. साडय़ा आणि ड्रेस मटेरिअल्सच्या स्टॉल्सवर आणि विविध प्रकारच्या आभूषणांच्या स्टॉल्सवर महिलांची गर्दी ओसंडून वाहत असते. मातीच्या भांडय़ांच्या स्टॉल्सवरही यंदा चांगली गर्दी असून त्यात सजावटीच्या सामानापासून ते उपयुक्त भांडय़ांपर्यंत सर्वच वस्तूंना चांगली मागणी असल्याने विक्रेतेही खूश आहेत.
संपूर्ण राज्यातील सर्व प्रांतांमधील मसाले, खाद्यपदार्थ इथे मिळतात. प्रत्येक भागातील स्टॉल्स असल्याने राज्यातील कोणत्याही भागातील व्यक्ती आली तरी तिला आपल्या गावाशी, परिसराशी संबंधित व्यक्तींचे खाण्यापिण्याच्या सवयींसंदर्भातील विविध स्टॉल्स हमखास दिसतातच. साहजिकच सर्वाधिक गर्दी खाद्यपदाथरंच्या स्टॉल्सवरच.. येथे मिळणाऱ्या हुडर्य़ाच्या थालीपीठाने सर्वावर मोहिनी घातली आहे. मांडे, दही धपाटे यांच्या स्टॉल्सवरही गर्दी आहे. यंदा एका बाजूस शाकाहारी, तर पलीकडे मांसाहारी अशी स्टॉल्सची विभागणी करण्यात आली. वातावरणात असलेला गारवा आणि समोर असलेले गरमागरम, वाफाळणारे खमंग खाद्यपदार्थ यामुळे भूकही अंमळ अधिकच लागलेली असते.. मग इथला फेरफटका आणखीनच ‘सरस’ होऊन जातो..
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
फुले आणि दिवे, थंडी आणि थालीपीठ..
बांबूची फुलदाणी, त्यात बांबूचीच विविध आकार आणि प्रकाराची रंगीबेरंगी फुले, बांबूच्याच खुच्र्या.. तांब्याच्या भांडय़ांची लकाकी कायम राहावी म्हणून नव्या तंत्रज्ञानाने लेपन केलेली चकचकीत भांडी, बस्तर आणि आदिवासी वारली शैलीतील चित्र-शिल्पकृती.. झोंबरा गारवा आणि हुडर्य़ाचे गरमागरम थालीपीठ,
First published on: 22-01-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flower and lamp cold thalipeet