मालाड येथील व्यावसायिकाच्या घरातून ५५ लाखांचा डल्ला मारून फरार झालेल्या तीन नोकरांना कुरार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.  त्यांच्याकडून ४९ लाखांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मालाड पश्चिमेच्या ‘सूची हाइट्स’ या इमारतीत राहणाऱ्या कपूर यांच्या घरात ३१ ऑक्टोबरच्या रात्री घरातील तीन नोकरांनी चोरी केली होती. घरातील मंडळी बाहेर गेलेली असताना वंदना कपूर या एकटय़ा होत्या. त्या वेळी या त्रिकुटाने त्यांना डांबून घरातील हिरे, सोन्याचे दागिने, महागडी घडय़ाळे असा सुमारे ५५ लाखांचा ऐवज चोरून नेला. हे तीनही नोकर १५ दिवसांप्रू्वी कपूर यांच्याकडे कामाला लागले होते.
या बाबत माहिती देताना कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर यादव यांनी सांगितले की, या तीनही नोकरांचा कसलाही  ठावठिकाणा उपलब्ध नव्हता. घरमालकाने त्यांना कामावर ठेवण्यापूर्वी कसलीही चौकशी केली नव्हती. तपास करीत असताना एक नोकर प्रवीण ऊर्फ रामप्रसाद कोल याच्या अलाहाबाद येथील घरी पोहोचले. परंतु त्याच्या मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकावरुन मोबाइलचा ठावठिकाणा लावून त्याचा शोध घेतला. हा आरोपी उत्तर प्रदेश, सुरत, बिहार आदी ठिकाणी पोलिसांना चकमा देत होता. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी उर्वरित तीन साथीदार राजू ऊर्फ शेखर (२५) संतोष सुमिया (२४) आणि सुरेश लल्लन (३०) यांनाही अटक         केली.
या आरोपींनी सुरेश लल्लन याच्या बिहारमधील घरासमोर पुरून ठेवलेला ४९ लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला. हे आरोपी ओळखीने घरकामाची नोकरी मिळवायचे आणि चोरी करून फरार व्हायचे. त्यांनी अन्य कुठे अशा पद्धतीने चोरी केली आहे का त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डफळे, पोलीस उपनिरीक्षक गौड आणि शिंदे यांच्या पथकाने केला.