सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाने रेडक्रॉस सारख्या संघटनेसह शहरातील रेडक्रॉस कार्यालयात मोफत प्रसुतीपूर्व तपासणी कक्ष सुरू केला आहे.
नगरसेविका प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक नाना महाले उपस्थित होते. भविष्यातही आरोग्य जागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात रेडक्रॉस आणि डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय अग्रेसर राहील, अशी ग्वाही महाले यांनी यावेळी दिली. या कक्षात डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ दर बुधवारी आणि शनिवारी गर्भवतींची विनामूल्य तपासणी करणार असून आवश्यक औषधेही मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी रेडक्रॉस ते वैद्यकीय महाविद्यालय अशी वाहन व्यवस्था विनामूल्य सुरू करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सर्वसाधारण प्रसुती आणि प्रसुती शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येते अशी माहिती रेडक्रॉसचे सचिव मेजर पी. एम. भगत यांनी दिली. सूत्रसंचालन डॉ. सुनील औंधकर यांनी केले. डॉ. प्रतिभा औंधकर यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी रेडक्रॉसच्या २५०४६२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.