शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना आर्थिक स्वावलंबित्त्व मिळावे या दृष्टीने इंद्रा नुयी, ऐश्वर्या राय बच्चन, किर्थिका रेड्डी, अनु आगा, किरण मुझुमदार, शोभा डे या कर्तबगार महिला ‘बिकॉज आय अ‍ॅम अ गर्ल’ या मोहिमेच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारता यावा यासाठी ‘एज्युकेट अ गर्ल’ ही योजना राबविण्यात येणार आहे. प्लॅन इंडियाने यासाठी एका वैशिष्टय़पूर्ण अ‍ॅपची निर्मिती केली आहे.
या अ‍ॅपच्या माध्यमातूनभारतातील दोन हजार मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारणी करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. http://www.educateagirl.com   या संकेतस्थळावर क्लिक करून या मोहिमेत सहभागी होता येईल. या संकेतस्थळावर आनंदी बालकाचे मोझेक सादर करण्यात आले आहे. ५०० रुपयांचे दान म्हणजे एक ठोकळा असे गणित आहे. जेव्हा एखादा दाता रक्कम दान करेल तेव्हा त्याचे चित्र त्या ठोकळ्यावर समाविष्ट केले जाईल. एका आठवडय़ात हे चित्र पूर्ण करण्याची प्लॅन इंडियाची योजना आहे.
या योजनेसाठी विविध क्षेत्रात स्वत:च्या कर्तुत्त्वाने उजळून निघालेल्या महिलांचे सहकार्य लाभले आहे. पेप्सिकोच्या अध्यक्ष इंद्रा नोयी, एझेडबी अ‍ॅण्ड पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय भागीदार झिया मोदी, फेसबुकच्या भारतातील कार्याच्या प्रमुख किर्थिका रेड्डी, जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगिता जिंदाल, लेखिका शोभा डे, व्हीएलसीसीच्या वंदना लुथ्रा, पर्यावरण कार्यकर्त्यां आरती किलरेस्कर, संगीतकार अनुष्का शंकर, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आदी महिलांनी या कार्याला मदत करण्याचे जाहीर केले आहे.