जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात १०१ जोडपी गुरुवारी एक लाख नागरिकांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाली. खर्चात काटकसर व मान्यवरांच्या उपस्थितीत विविध धर्माच्या रीतीरिवाजाने हे विवाह थाटामाटात संपन्न झाल्याने वधू-वरांच्या पित्यांना ऐन दुष्काळात दिलासा मिळाला.
या वेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महिला बालकल्याण मंत्री श्रीमती वर्षां गायकवाड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, भाग्यश्री पाटील, मुकुंद शहा यांच्यासह सुमारे एक लाख नागरिक उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील व त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी जिजाऊ महिला बचत गट असोसिएशनच्या माध्यमातून या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी पाटील म्हणाले, ‘अशा विवाहात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना दहा हजार रुपये अनुदानाऐवजी २५ हजार रुपये अनुदान देण्याची गरज असून, ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.’ वर्षां गायकवाड म्हणाल्या, ‘हुंडा, थाटमाट, अहंकार बाजूला ठेवून अशा विवाह समारंभात सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. सामुदायिक विवाहाबरोबरच नोंदणी विवाह ही काळाची गरज आहे.’ समारंभास मयूरसिंह पाटील, रमेश जाधव, सारिका काळे, ऋतुजा पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.