पुण्यातील महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क वसुली होत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने समाज कल्याण विभागाकडे माहिती मागितली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्कवसुली होत असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, असा कायदा आहे. पुण्यातील महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्कवसुली केली जात असल्याबाबत सिद्धार्थ शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पुणे विद्यापीठासह पुण्यातील नामवंत महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांचा या याचिकेमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या याचिकेची सुनावणी नुकतीच झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने समाज कल्याण विभागाकडे या संदर्भातील माहिती मागितली आहे. ही माहिती सादर करण्यासाठी विभागाला चार आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे.