मातृभाषा आणि राष्ट्रभाषा या दोन माध्यमातून होणारे शिक्षण व आकलन अत्यंत प्रभावी असते. हिंदू भाषा ही सर्वाना एकत्रित आणण्याचे महत्वाचे  साधन असून तिला विश्वभाषेचा दर्जा  देण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे साहित्यिक तेजेंद्र शर्मा यांनी  सांगितले.
भुसावळ कला, विज्ञान आणि नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त पदव्युत्तर हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी चर्चासत्राचे उद्घाटन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शिवाजी देवरे, महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. मधु खराटे, स्वागताध्यक्ष मोहन फालक, संस्थेचे अध्यक्ष महेश फालक आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी महाविद्यालयाच्या ५० वर्षांतील शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला. ‘प्रवासी भारतीय साहित्यिकांचे हिंदी साहित्यातील योगदान’ या विषयावर भूमिका मांडताना शर्मा यांनी एखादा प्रवासी लेखक होऊ शकतो, मात्र लेखन प्रवासी होऊ शकत नाही, असे सांगितले. लेखन हे सभोवतालच्या सत्य व अभ्यासपूर्ण परिसिथतीवर बऱ्याचवेळा अवलंबून असते.
 आ. शिरीष चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात ‘प्रवासी भारतीय साहित्यकारोंका हिंदी उपन्यास साहित्य मे योगदान’ या विषयावर एकूण २० शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. संगीत विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.