श्री क्षेत्र पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त कराड बाजार समितीतर्फे घोडय़ांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आदी परराज्यातीलही जातिवंत घोडे सहभागी होत आहेत. येत्या गुरुवारी (दि. २४ ) सायंकाळी ४ वाजता घोडय़ांच्या यात्रेचा प्रारंभ महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक धनाजीराव नाईक यांच्या हस्ते समारंभपूर्वक पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील हे राहणार आहेत. तर आमदार बाळासाहेब पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, जनता उद्योग समूहाचे प्रमुख विलासराव पाटील-वाठारकर, बाजार समितीचे सभापती दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील यांची या वेळी उपस्थिती राहणार आहे. घोडय़ांच्या यात्रेमध्ये काठेवाडी, पंजाबी, पंचकल्याणी, काळा व तांबडा अबलख, तेलंगी यासह विविध प्रकारचे घोडे येणार आहेत तरी घोडे खरेदी व विक्री करणाऱ्या हौशी घोडेप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.