गोंधवणी येथील हातभट्टीच्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून दोघा पोलिसांवर झालेल्या कारवाईनंतर आता शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सपकाळे यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांच्या कारवाईमुळे हरेगाव परिसरातील दारूविक्रीही थांबली आहे.
हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडी व ब्राह्मणगाव येथील महिलांनी दोन महिन्यांपासून दारूबंदी अभियान सुरू केले आहे. दारूबंदी मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या सरपंच चंद्रकला गायकवाड यांना दारूविक्रेत्यांनी मारहाण केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन साळुंके-ठाकरे यांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यानंतर या चार गावांतील हातभटय़ा बंद झाल्या होत्या. पण गोंधवणी येथील हातभट्टय़ा सुरू होत्या. या हातभट्टय़ांची दारू हरेगाव परिसरात जात होती. त्यामुळे कारवाई करण्याचे आदेश निरीक्षक सपकाळे यांना देण्यात आले होते. त्यांनी केवळ थातूरमातूर कारवाई केली. अखेर साळुंके-ठाकरे यांनी छापे घातले होते. या छाप्यानंतर हवालदार व्ही. के. खेडकर व पोलीस नाईक ए. एम. दहीफळे यांना निलंबित करण्यात आले. आता निरीक्षक सपकाळे यांचीही खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. हातभट्टीच्या दारूबद्दल प्रथमच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले असून, त्यामुळे अनेक गावांतील हातभट्टय़ा बंद झाल्या आहेत. हरेगाव परिसरातील दारूबंदी मोहिमेला या कारवाईमुळे मोठे यश मिळत आहे.