राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या सुरक्षेसाठी डझनाहून अधिक सुरक्षा रक्षक असतानाही या कार्यालयात चोरीचे सत्र सुरूच आहे. रविवारी कार्यालयाच्या लेखा विभागातून तीन संगणकांची चोरी झाली. तीन महिन्यांपूर्वीही असाच प्रकार झाला होता.
एसटीच्या पुणे विभागातील सर्व कारभार चालणाऱ्या कार्यालयामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. विविध विभागातील संगणकांमध्ये महत्त्वाच्या नोंदी आहेत. त्यामुळे या कार्यालयाची सुरक्षा एसटीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अशा कार्यालयामध्ये चोरी होत असल्याने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेजे आहे, मात्र वारंवार चोरीच्या घटना होत असल्याने या कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यालयाच्या सुरक्षेसाठी तिन्ही पाळ्यांमध्ये एसटीचे तीन, तर खासगी सुरक्षा यंत्रणेचे ११ सुरक्षा रक्षक आहेत. पुरेसे सुरक्षा रक्षक असतानाही चोऱ्यांचे प्रकार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचा विभाग असलेल्या लेखा विभागातील तीन संगणकांची चोरी झाली. तीन महिन्यांपूर्वीही याच कार्यालयात चोरीचा प्रकार झाला होता. त्याचप्रमाणे कार्यालयातील उपाहारगृहही दोन वेळा चोरटय़ांनी फोडले आहे. तीनही पाळ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षत तैनात असतानाही कार्यालयामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या चोरीच्या घटना होत असल्याबाबत सध्या कार्यालयाच्या सुरक्षेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.