दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या विशेष राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कोल्हापूर एनसीसी गट मुख्यालयाच्या छात्रसैनिक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पथकाने राष्ट्रीय पातळीवर नृत्याविष्कार व बेस्ट टर्न आऊट या प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत ट्रॉफी तसेच २० सुवर्णपदकांची कमाई केली आणि महाराष्ट्राला पंतप्रधान ध्वजाचा सन्मान मिळवून देण्यात भरीव योगदान दिले. या पथकाचे नेतृत्व काँटिजन्ट कमांडर म्हणून एनसीसी अधिकारी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा यांनी केले.     
दिल्ली येथे विशेष राष्ट्रीय एकात्मता शिबिराबरोबरच प्रायमिनिस्टर रॅलीमध्ये कोल्हापूर एनसीसी गट मुख्यालयाच्या छात्रसैनिकांच्या पथकाने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दिल्लीमधील गॅरिसन परेड ग्राऊंडवर झालेल्या प्रायमिनिस्टर रॅलीला देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टोनी, संरक्षण राज्यमंत्री, संरक्षण खात्याचे सचिव व अधिकारी वर्ग यांची उपस्थिती होती. ही रॅली संपल्यानंतर लगेचच एनसीसीचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल पी. एस. भल्ला यांनी कोल्हापूरच्या पथकाची भेट घेऊन अभिनंदन केले.    
दिल्लीतील विशेष राष्ट्रीय एकात्मता शिबिरात देशभरातील १७ राज्यांतील छात्रसैनिकांची पथके सहभागी झाली होती. कोल्हापूर गट मुख्यालयाकडील महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या छात्रसैनिकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा दाखविणारे लोकनृत्य सादर केले व महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे विविध पदर उलगडत काही समाज प्रबोधनपर संदेशही दिले. नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर यांनी बसविलेला हा नृत्याविष्कार शिबिरातील सर्वोत्तम नृत्याविष्कार ठरला.