गोदा लाभक्षेत्रात शेती व पिण्याला पाणी
गोदावरीच्या उजव्या व डाव्या कालव्यातून आज सकाळी शेती व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. सोमवापर्यंत कोपरगाव व राहाता तालुक्याच्या टोकाला हे पाणी पोहोचणे अपेक्षित असुन तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हे आवर्तन मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
नाशिक जिल्ह्य़ातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून डाव्या कालव्यासाठी आज सकाळी ११ वाजता १०० क्युसेकने तर दुपारी १ वाजता उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. टप्प्या, टप्प्याने त्यात वाढ करण्यात येणार आहे. हे आवर्तन संपल्यानंतर किती पाणीसाठा शिल्लक रहातो यावर पुढच्या आवर्तनाचा निर्णय घेतला जाणार आहे. वितरीकांच्या दुरूस्तीसाठी आवर्तनाला आठ दिवस विलंब करण्यात आला, मात्र ही दुरूस्तीच न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कालवा  सल्लागार समितीच्या बैठकीत वितरिकांची दुरूस्ती करण्याचा निर्णय होऊनही निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत पाटबंधारे विभागाने ही कामे टाळली आहेत. शेतकऱ्यांनीच ही दुरूस्ती करावी असा फतवा या विभागाने काढल्याने नाराजी अधिकच तीव्र झाली आहे.
दरम्यान राहाता परिसरातील वितरीका दुरूस्त करण्यासाठी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विशेष मोहिम आखली आहे. राहात्याचे नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांना या वितरीका दुरूस्त करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. नगरपालिकेने जेसीबीसारखी येत्रे लावुन तातडीने ही कामे पुर्ण करावी अशा सुचना विखे यांनी दिल्या आहेत. नगरपालिकेने त्यासाठी दोन जेसीबी पाटबंधारे विभागाला दिले, मात्र डिझेलअभावी ही वाहने ताब्यात घेण्यास या विभागाने नकार दिल्याने अखेर नगरपालिकेने डिझेलसह ही यंत्रे त्यांना दिली. गोदावरीच्या लाभक्षेत्रात कालव्यांवर अवलंबुन असणारी शेतीबरोबरच गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही या आवर्तनामुळे तुर्त सुटेल. याच आवर्तनात पिण्याच्या पाण्याचे साटवण तलाव भरून घेण्यात येणार आहेत. मात्र धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचे आत्ताच योग्य नियोजन न झाल्यास त्याचा फटका पुढच्या आवर्तनाला बसणार आहे.