उपजिल्हा रूग्णालयात निवारा गृहाचे उद्घाटन
मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारागृह व जलकुंभाचे उद्घाटन आ. पंकज भुजबळ यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे होते. येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या दृष्टीने विविध सेवा सुविधा गरजेच्या होत्या. त्यानुसार निवारागृह व जलकुंभ उभारण्यात आले. पाच शव शितपेटय़ा मंजूर झाल्या असून रुग्णालयात जनरेटरही लवकर मिळणार आहे. लवकरच त्रुटी दूर करून आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता दिली जाईल. नागरिकांनी हे आपले रुग्णालय आहे. या दृष्टीने पहावे आणि डॉक्टरांनीही नि:स्वार्थी भावनेने रुग्णसेवा द्यावी, असे आवाहन  आ. भुजबळ यांनी केले आहे. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, राजाभाऊ अहिरे, साईनाथ गिडगे, रुग्णसेवा समितीचे सदस्य अशोक व्यवहारे, अ‍ॅड. सुधाकर मोरे, विलास कटारे आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एम. होले यांनी प्रास्तविक केले. उपजिल्हा रुग्णलयात सुरू असलेल्या विविध रुग्ण सुविधा आणि योजनांचा आढावा घेण्यात आला.
शैक्षणिक शिबीर
नाशिक डायोसेशन कौन्सिलव्दारा मनमाडच्या संत बार्णबा विद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक शिबीर झाले. अध्यक्षस्थानी कौन्सिलचे बी. जे. साळवे हे होते. थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांचे कार्य बोध घेण्यासारखे आहे. तोच वारसा आजच्या शिक्षण संस्थांनी पुढे चालवावा, असे आवाहन यावेळीे आ. भुजबळ यांनी यावेळी केले. भुजबळ यांनी शैक्षणिक शिबीराचे उद्घाटन केले. तसेच संस्थेचे नियोजित तांत्रिक विद्यालय आणि व्यापारी संकुलाच्या कामाचे भूमीपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे आदी उपस्थित होते.
गुरूनानक जयंतीचे कार्यक्रम
मनमाड येथील गुरूव्दारात गुरूनानक जयंती उत्साहात साजरी झाली. देशाच्या विविध भागातून हजारो भाविकांनी यावेळी गुरूव्दारात दर्शन घेतले. गुरूव्दारा गुपतसर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मध्यरात्री सुमारे दोन तास आतषबाजी करण्यात आली.गुरूवाणी व अखंड पाठामुळे मनमाड गुरूव्दाराचा परिसर तीन दिवस हजारो भाविकांच्या भक्तीने फुलून गेला. अखंड पाठ, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, लंगर आदी कार्यक्रमांमध्ये हजारो शीख बांधवांसह सर्वधर्मीय भाविक सहभागी झाले होते. गुरूव्दारा प्रबंधक बाबा फौजासिंग यांच्यासह व्यवस्थापकांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले. मानवता हाच खरा लोककल्याणाचा मार्ग असल्याचा संदेश गुरूव्दारात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना दररोज दिला जातो, असे बाबा फौजसिंग यांनी सांगितले.
विवेकानंदांच्या जीवनावरील प्रदर्शन
स्वामी विवेकानंदांचे जीवन, उपदेश आणि कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘विवेक एक्स्प्रेस’ या चलसंग्रहालय रेल्वे गाडीतील प्रदर्शन पाहण्यासाठी मनमाड रेल्वे स्थानकात प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय रेल्वेने ‘विवेक एक्स्प्रेस’ या गाडीव्दारे भारतात विवेकानंदांच्या कार्याचा प्रचार करण्यात येत आहे. या प्रदर्शनीय रेल्वेगाडीत स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा चित्रमय आढावा घेण्यात आला आहे. स्वामींचे घर, रामकृष्ण मिशनची स्थापना, विवेकानंदांनी दिलेला सार्वजनिक उपदेश व त्यांच्या जीवनातील ठळक प्रसंगांची या प्रदर्शनात आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वेच्या तीन बोग्या वातानुकूलित करण्यात आल्या आहेत.