चोरटय़ांनी आता आपला मोर्चा शहरातील मंगल कार्यालयांकडे वळवला आहे. काल व आज अशा दोन दिवसांत तीन मंगल कार्यालयात झालेल्या चोऱ्यांत चोरटय़ांनी पाहुण्यांकडील सुमारे ४ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोकड पळवली.
आज सकाळी पुणे रस्त्यावरील ओम गार्डन मंगल कार्यालयात झालेल्या चोरीत सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचे दागिने पळवण्यात आले. या संदर्भात श्रीमती अलका अंबादास गोसावी (रा. देऊळगावराजा, बुलढाणा) यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गोसावी यांनी त्यांच्याकडील बॅग खुर्चीवर ठेवून त्या हात पाय धुवण्यासाठी गेल्या, तेवढय़ात बॅग लांबवण्यात आली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
गुलमोहर रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालयात काल रात्री झालेल्या चोरीत १ लाख १० हजार रु. चा ऐवज पळवण्यात आला. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिपक दत्तात्रेय कुलकर्णी (ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास कुलकर्णी कार्यालयात गेले व एका मोकळ्या खुर्चीवर त्यांनी बॅग ठेवली, त्यांची नजर चुकवून कोणीतरी बॅग पळवली.
काल सकाळी मनमाड रस्त्यावरील वृदांवन मंगल कार्यालयातून सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग हिसकावून चोरटय़ाने पळ काढला. श्रीमती अलका यशवंत पवार (सावेडी) यांनी तोफखाना पोलीसांकडे तक्रार दिली आहे. त्या लग्न समारंभासाठी आल्या होत्या, कोणीतरी त्यांच्या अंगावर घाण टाकली, ती साफ करत असतानाच चोरटय़ांनी बॅग हिसकावली.