पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे गतवर्षी इचलकरंजी शहरात पसरलेल्या भीषण कावीळ साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली बठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ. सुरेश हाळवणकर यांनी दिली आहे.
आ. हाळवणकर यांनी २४ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे पत्र पाठवून ही बठक आयोजित करण्याची मागणी केली होती. इचलकरंजी शहरात जून २०१२ च्या दरम्यान काविळीची साथ पसरून अनेक नागरिक गतप्राण झाले. सुमारे ५ हजारजणांना काविळीची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर सध्या नदीपात्रात केंदाळाचे प्रमाण पुन्हा वाढत असून पाणी प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, हागवण, टायफाईड आदी जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यासाठी पूर्व उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. सदर प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पंचगंगा प्रदूषण नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यावर विचारविनीमय करून तातडीने काही निर्णय घेण्याची मागणी आ. हाळवणकर यांनी केली होती. त्यानुसार  शनिवार, दि. ३० रोजी ही बठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ. हाळवणकर यांनी दिली आहे.